भावी पत्नीची सासूची हत्या करुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबिक वादातून लग्नास विरोध केल्यामुळे हत्या केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
विरार, – कौटुंबिक वादातून लग्नास विरोध होत असल्याने रागाच्या भरात एका तरुणाने त्याच्याच भावी पत्नीसह सासूची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली, या हत्येनंतर त्याने त्याच हत्याराने स्वतच्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. नॅन्सी मिश्रा आणि सरीता मिश्रा अशी हत्या झालेल्या मायलेकीची नावे असून जखमी तरुणाचे नाव शिवम उपाध्याय आहे. त्याच्याविरुद्ध बोळींज पोलिसांनी दुहेरी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्यााने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुठल्या कारणावरुन अचानक सरीताने नॅन्सी आणि शिवम यांच्या लग्नाला विरोध केला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजता विरार येथील गोकुळ टाऊनशीप, पूनम आकांक्षा इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये सरीता ही तिची मुलगी नॅन्सीसोबत राहत होती. तिचे नालासोपारा येथे राहणार्‍या शिवमशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने त्यांचा विवाह ठरला होता. मात्र काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादानंतर सरीताने त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. तिने नॅन्सीचे लग्न शिवमसोबत करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या संपूर्ण प्रकणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी मंगळवारी रात्री शिवम हा त्याच्या कुटुंबियांसोबत नॅन्सीच्या घरी आला होता. मात्र सरीताचा त्यांच्या लग्नाला विरोध कायम होता.

याच कारणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने शिवम हा त्याच्या कुटुंबियांसोबत तेथून निघून गेला होता. बुधवारी सकाळी अकरा वाजता तो पुन्हा नॅन्सीच्या घरी आला होता. त्याने सरीताचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. तो नॅन्सीशिवाय राहू शकत नाही. तिच्याशिवाय तो कोणाशी लग्न करणार नाही. त्यामुळे तिने त्यांच्या लग्नाला संमती द्यावी यासाठी त्याने तासभर प्रयत्न केला. मात्र सरीताने त्याला विरोध कायम असल्याचे सांगून त्याला घरातून निघून जाण्यास सांगितला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातील तिक्ष्ण हत्याराने सरीतासह नॅन्सीवर वार केले होते. त्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.

अचानक झालेल्या आरडाओरडानंतर तिथे स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली होती. तोपर्यंत शिवमने त्याच हत्याराने स्वतच्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ झालेल्या या तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे सरीता आणि नॅन्सीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी शिवमविरुद्ध पोलिसांनी दुहेरी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुठल्या कौटुंबिक वादामुळे सरीताने लग्नाला विरोध दर्शविला होता याबाबत काहीही खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळे शिवमच्या पालकासह नातेवाईकांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या दुहेरी हत्येसह आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page