हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस 36 वर्षांनी अटक
मुंबईतून पळून गेल्यानंतर वलसाडला वास्तव्यास होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड वयोवृद्ध आरोपीस 36 वर्षांनी बोरिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. राजेश श्यामलाल सिंग ऊर्फ बाबा असे या 60 वर्षांच्या आरोपीचे नाव असून मुंबईतून पळून गेल्यानंतर तो गुजरातच्या वलसाडला वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्ध कोर्टाने वॉरंट जारी केले होते. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके यांनी सांगितले.
राजेश सिंग ऊर्फ बाबा हा कांदिवलीतील हनुमाननगर, कदमवाडी, भगवान फोटो स्टुडिओजवळी रुम क्रमांक 365 मध्ये राहत होता. जानेवारी 1990 साली बोरिवलीतील एमएचबी परिसरात क्षुल्लक वादातून त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता. याप्रकरणी राजेश सिंगविरुद्ध बोरिवली पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या राजेशला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वकिलांनी त्याच्यासाठी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिन मंजूर होताच राजेश हा पळून गेला होता. तो खटल्याच्या नियमित सुनावणीसाठी गैरहजर राहत होता. गेल्या 36 वर्षांपासून तो फरार होता. त्यामुळे त्याला कोर्टाने वॉण्टेड आरोपी घोषित करुन त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. यावेळी कोर्टाने त्याच्या अटकेचे आदेश बोरिवली पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या नातेवाईक, मित्रासह स्थानिक रहिवाशांकडून पाठपुरावा करुन त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते.
अलीकडेच राजेश हा गुजरातच्या वलसाड परिसरात राहत असल्याची माहिती तडीपार कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे, प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, पोलीस हवालदार भालचंद्र थोरात, पोलीस शिपाई स्वप्निल पवार, कैलास उगले आदीचे एक पथक गुजरातला पाठविण्यात आले होते. या पथकाने वलसाड परिसरात राजेशचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला वलसाडच्या उमरग्राम परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या 36 वर्षांपासून राजेश हा वॉण्टेड होता, त्याच्याविषयी कोणतीही माहिती नसताना प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, पोलीस हवालदार भालचंद्र थोरात, पोलीस शिपाई स्वप्निल पवार, कैलास उगले यांनी सतत पाठपुरावा करुन त्याची माहिती काढून त्याला वलसाड येथून शिताफीने अटक केली. या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.