प्रेमविवाह केल्याचा रागातून बहिणीसह पतीला चाकूने भोसकले
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी भावाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहिणीसह तिच्या पतीला भावाने चाकूने भोसकल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात फैजान अजीज शेख आणि त्याची पत्नी हिना फैजान शेख असे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या सलमान मोहम्मद आयुब शेख ऊर्फ सालू या 24 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. सलमान आणि हिना हे दोघेही बहिण-भाऊ असून हिनाने फैजानसोबत प्रेमविवाह केला म्हणून रागाच भरात त्याने दोघांवर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सलमानला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावनी आहे.
ही घटना सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर, रतन जनरल स्टोरसमोर घडली. फैजान शेख हा याच परिसरातील गुप्ता मोबाईल गल्ली क्रमांक दहा/अकरामध्ये राहतो. याच परिसरात सलमान हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. सलमानची बहिण हिना हिचे फैजानसोबत प्रेमसंबंध होते. तिला फैजानसोबत लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधासह विवाहाला सलमान शेखच्या कुटुंबियांचा विरोध होता. या विरोधाला न जुमानत फैजान आणि हिना यांनी प्रेमविवाह केला होता. त्याचा सलमानच्या मनात राग होता.
सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता फैजान आणि हिना हे दोघेही संत ज्ञानेश्वर नगर, रतन जनरल स्टोरसमोर उभे होते. तिथे सलमान आला आणि त्याने फैजानला शिवीगाळ करुन वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. हिनासमोरच त्याने फैजानला बेदम मारहाण केली होती. लाथ्याबुक्यांनी मारहाण करताना हिनाने त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच वादानंतर काही कळण्यापूर्वीच रागाच्या भरात सलमानने फैजानसह हिनावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. पोटात गंभीर दुखापत झाल्याने ते दोघेही जागीच कोसळले होते. या हल्ल्यानंतर सलमान तेथून पळून गेला होता.
रक्तबंबाळ झालेल्या फैजान आणि हिना यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या फैजानची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. त्याच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्याच्या तक्रारीनंतर सलमान शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सलमानला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.