हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन कुटुंबातील तिघांची फसवणुक
धारावीतील रुम मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे पंधरा लाखांचा अपहार करुन एकाच कुटुंबातील तिघांची फसवणुक झाल्याचा प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुममालक अफसर जुम्मन शहा याच्याविरुद्ध धारावी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अफसरने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
मोहम्मद दाऊद समीर अहमद फारुखी हा कापड व्यापारी असून सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतो. पूर्वी तो धारावी परिसरात राहत असल्याने त्याला तिथे हेव्ही डिपॉझिटवर रुम हवा होता. त्यामुळे त्याने त्याचा परिचित आणि मित्र अफसर शहा याला रुमबाबत सांगितले होते. काही दिवसांनी त्याने त्याचा धारावीतील लक्ष्मीबाग, सोशलनगर, शराफत चाळीत वन प्लस वन रुम असून त्याला तो रुम हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले. त्यामुळे त्याने रुमची पाहणी करुन त्याच्याकडून पाच लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर रुम घेण्याचा निर्णय घेतला होता. 16 जानेवारी 2023 रोजी त्याने अफसरला पाच लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात अकरा महिन्यांचा भाडेकरार झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने रुमचा ताबा दिला नाही,
चौकशीनंतर त्याने तिथे आधीच भाडेकरु ठेवल्याचे मोहम्मद दाऊदच्या निदर्शनास आले होते. विचारणा केल्यानंतर त्याने त्याला दरमाह सात हजार भाडे देण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी ते डिसेंबर या कालावधीत त्याला सात हजाराप्रमाणे 77 हजार रुपये भाडे दिले. मात्र नंतर त्याने भाड्याची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे त्याने त्याच्याकडे हेव्ही डिपॉझिट म्हणून दिलेल्या पाच लाखांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने त्याला पैसे दिले नाही.
चौकशीदरम्यान अफसरने अशाच प्रकारे त्याचा मावस भाऊ मोहम्मद हबीब मोहम्मद युनूस शेख आणि सासरे अशरफ शेख यांनाही हेव्ही डिपॉझिटवर रुम देतो असे सांगून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले होते. त्यांच्यासोबत एक वर्षांचा भाडेकरार केला होता. मात्र त्यांना रुमचा ताबा न देता त्यांनी दिलेल्या सुमारे दहा लाखांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच मोहम्मद दाऊदने धारावी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अफसर शहा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अफसर शहा याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आतापर्यंत अफसरने एकाच कुटुंबातील तिघांची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे, त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.