डी मार्टमध्ये चोरी करणार्या बुरखाधारी महिलांना अटक
महिलांसह सहकार्याविरुद्ध इतर काही गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – मालाड येथील पामकोर्टजवळील डी मार्टमध्ये खरेदीच्या नावाने फिगारो कंपनीचे ऑलिव्ह ऑईलचे साडेतेरा हजाराचे एकोणीस डब्बे चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत गेल्या दिड महिन्यांपासून फरार असलेल्या दोन बुरखाधारी महिलांना पोलिसांनी अटक केली. रिता सुभाषप्रसाद ऊर्फ रुमा वृजेश मध्येशिया आणि सानिया बाबूमियाँ शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघींनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांचा एक सहकारी वृजेश सिताराम मध्येशिया असून या टोळीने भोईसर आणि नालासोपारा येथे अशाच प्रकारे चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सुनिल विश्वनाथ शिंदे हे कांदिवलतील चारकोप, मेघछाया सोसायटीमध्ये राहतात. गेल्या सात वर्षांपासून तो एएसएल सुपरमार्केटमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. सध्या त्याची नेमणूक मालाडच्या पामकोर्टशेजारील डी मार्टमध्ये आहे. त्यांच्या डी मार्टमधील दररोज विक्री केलेला माल आणि शिल्लक मालाची रोज तपासणी केली जाते. 15 मार्चला रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सर्व स्टॉकची तपासणी कररण्यात आली होती. त्यात फिगारो ऑलिव्ह ऑईलचे विक्री आणि शिल्लक मालामध्ये तफावत दिसून आली होती. त्यामुळे त्यांनी डी मार्टच्या सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यात एक पुरुष आणि दोन बुरखाधारी महिला संशयास्पद फिरताना तसेच या महिला त्यांच्या बुरख्याच्या आतमध्ये काही फिगारो ऑलिव्ह ऑईलचे चोरी करत असल्याचे दिसून आले होते.
या दोन्ही महिलांनी सुमारे साडेतेरा लाखांचे फिगारो कंपनीचे ऑलिव्ह ऑईल एकोणीस डब्बे चोरी केले होते. रात्री पावणेआठ वाजता ते तिघेही तेथून निघून गेले होते. तपासात संशयित आरोपीचे नाव वृजेश मध्येशिया असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा उत्तरप्रदेश, देवरिया, भगोजघाट घाटनारचा रहिवाशी असून सध्या जोगेश्वरी परिसरात राहतो. मजुरीचे काम करणारा वृजेश हा दोन्ही महिलांसोबततिथे आला होता. या टोळीने पालघरच्या भोईसर आणि नालासोपारा येथील सुपरमार्केटमध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघडकीस आले होते.
चोरीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध भोईसर आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच सुनिल शिदें यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चोरीचे सीसीटिव्ही फुटेज दिले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वृजेशसह इतर दोन बुरखाधारी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रिता मध्येशिया आणि सानिया शेख या दोघांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघींनाही पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघींनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.