बारा वर्षांपूर्वी झालेल्या अपहरणासह हत्येचा पर्दाफाश करण्यात यश
हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिन्ही मारेकर्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – बारा वर्षांपूर्वी करण अरविंद बागुल या 23 वर्षांच्या तरुणाचे अपहरण करुन त्याची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन सहकार्यांना पोलिसांनी अटक केली. सुरेंद्र पांडुरंग पाटील, चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाल देगावत ऊर्फ छोटू अशी या तिघांची नावे आहेत. यातील सुरेंद्र हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात चौदाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने शनिवार 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जमिनीच्या विकसित करण्याच्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
करण बागुल हा दावडी गावचा रहिवाशी आहे. 2014 रोजी त्याचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलिसांत त्याच्या अपहरणाची तक्रार केली होती. या गुन्ह्यांचा मानपाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. बारा वर्ष उलटूनही करणचा शोध लागला होता. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी करणीशी संबंधित सर्व नातेवाईक, मित्रांसह स्थानिक रहिवाशांची चौकशी सुरु केली होती. या चौकशीतून जास्तीत जास्त माहिती ाकढून पोलिसांनी सुरेंद्र पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सुरेंद्र हा डोबिंवलीच्या मोती मिठाईवाला, श्री धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. त्याचे करणासोबत जमिनीच्या विकसित करण्यााच्या आर्थिक देवाणघेवाणातून वाद सुरु होता. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला त्याने करणच्या अपहरणामागे त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ामत्र नंतर त्याने त्याचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याची कबुली दिली. याकामी त्याने चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत यांची मदत घेतली होती. अपहरणानंतर त्यांनी करणला त्याच्या दावडी गावातील ऑफिसमध्ये आणले होते. तिथे त्यांनी त्याची लोखंडी रॉडने बेदम मारहाण हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह कारमधून मुरबाड, बारवी डॅमजवळील जंगलात आणून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
7 ऑक्टोंबर 2024 रोजी करणाचा मृतदेह मुरबाड पोलिसांना सापडला होता. मात्र त्याची ओळख पटली नव्हती. चौकशीअंती तो मृतदेह करण असल्याचे तसेच त्याचे अपहरण झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात झाल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सुरेंद्रच्या बांधकाम साईटवर काम करणार्या चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीही करणचे अपहरण करुन त्याची हत्या तसेच त्याचा मृतदेह जंगलात आणून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. कुठलाही पुरावा नसताना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बारा वर्षांपूर्वी झालेल्या अपहरणासह हत्येचा पर्दाफाश करुन तिन्ही आरोपींना शिताफीने अटक केली. यातील सुरेंद्रविरुद्ध मानपाडा, कोळशेवाडी, डोंबिवली, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोलीस हवालदार विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, पोलीस नाईक दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरुनाथ जरग, पोलीस शिपाई मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिंदर साळुंखे, सतीश सोनावणे, महिला पोलीस शिपाई मंगल गावित, चालक पोलीस हवालदार-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी केली.