दोन घटनेत फ्लॅटच्या आमिषाने दोघांची 85 लाखांची फसवणुक
ताडदेव व पंतनगर पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत फ्लॅटच्या आमिषाने दोन व्यक्तींची सुमारे 85 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर आणि ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ताडदेव आणि पंतनगर पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विवेक किसन सांगाठिया आणि शरद खाशाबा अडसुळे अशी या दोघांची नावे आहेत. यातील एका गुन्ह्यांत बँकेत मार्गेज ठेवलेल्या फ्लॅटवर 38 लाखांचे गृहकर्ज असताना फ्लॅट खरेदी-विक्री तर दुसर्या गुन्ह्यांत एमएमआरडीएचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा घालण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार गिरगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी ते ताडदेवच्या तुळशीवाडीमध्ये फ्लॅटचा शोध घेत आहे. याच दरम्यान त्यांची एजंटामार्फत विवेक सांगाठियाशी ओळख झाली होती. त्याच्या मालकीचा तुळशीवाडी, सम्राट अशोक नवनिर्माण सोसायटीमध्ये एक फ्लॅट होता. या फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी तो फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांनी विवेकशी फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी त्याला टोकन म्हणून दोन लाख दिले होते. काही दिवसांनी त्यांनी त्याला 54 लाख 45 हजार ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी त्यांनी एका खाजगी बँकेतून गृहकर्ज काढले होते.
या कर्जाचे सव्वातीन लाखांचा हप्ताही त्यांनी भरला आहे. अशा प्रकारे त्यांनी फ्लॅटसाठी विवेकला 59 लाख 70 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅट रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. रजिस्ट्रेशननंतर त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला होता. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने फ्लॅटचे मूळ कागदपत्रे दिले नव्हते. ऑगस्ट 2025 रोजी त्यांना एका बँकेची नोटीस आली होती. त्यात या फ्लॅटवर विवेकने 38 लाखांचे कर्ज घेतल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी विवेककडे विचारणा केली होती, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. मार्गेज असलेल्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन विवेकने त्यांची 59 लाख 70 हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी विवेकविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार चालक असून ते घाटकोपर परिसरात राहतात. त्यांच्या मित्राने त्यांची शरद अडसुळेशी ओळख करुन दिली होती. या ओळखीत त्याने शरद हा एमएमआरडीएमध्ये सर्व्हेवर अधिकारी असल्याचे सांगून त्याची तिथे चांगली ओळख आहे. तो त्यांना स्वस्तात एमएमआरडीए फ्लॅट मिळवून देईल असे सांगितले होते. त्यामुळे ते शरदला घाटकोपर येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेले होत. यावेळी त्याने त्यांना कांजूरमार्ग येथे एमएमआरडीए इमारतीच्या पुर्नविकासाचे काम सुरु असून तिथे त्यांना पंधरा लाखांमध्ये वन बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या आई आणि मित्रासाठी तीन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी स्वतसह आईसाठी त्यांनी त्याला टप्याटप्याने 26 लाख 50 हजार रुपये दिले होते. यावेळी शरदने त्यांना तीन महिन्यांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले.
त्यांना फ्लॅटचे मंजुरीचे पत्र देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना दोन्ही फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केल्यानंतर सुरक्षारक्षकांना त्यांना म्हाडा कार्यालयात चौकशी करण्यास सांगितले. त्यामुळे ते तिथे गेले होते. तेथील अधिकार्यांना फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर दाखविले असता ते पत्र बोगस असल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांच्याकडे शरद अडसुळे नावाचा कोणीही व्यक्ती कामाला नसल्याचे सांगितले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पंतनगर आणि ताडदेव पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे.