२८ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर केअरटेकर महिलेची हातसफाई

सहजच घरातील सीसीटिव्ही कॅमेरा पाहिल्यानंतर चोरीचा पर्दाफाश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जून २०२६
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून सुमारे २८ लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांवर केअरटेकर महिलेने हातसफाई केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिबा मंसुर शेख या ४० वर्षांच्या आरोपी केअरटेकर महिलेविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तिच्यावर अटकेची कारवाई केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिबा घरी काय करते म्हणून तक्रारदाराने सहजच मोबाईनवर सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना ८ सप्टेंबर २०२५ ते २२ जून २०२६ या कालावधीत मालाड येथील चिंचोली बंदर रोड, व्हिस्परिंग हाईट्स मांईडस्पेस अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक बी/२०६ मध्ये ५५ वर्षांचे व्यकंटेश वर्दराजन गोमतम हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते व्ही ग्रुप शिपिंग कंपनीत संचालक म्हणून काम करत असून या कंपनीचे मुख्य कार्यालय गोरेगाव परिसरात आहे. ८ जून २०२६ रोजी त्यांची पत्नी लक्ष्मीप्रिया हिचे कॅन्सर आजाराने निधन झाले होते. ती आजारी असल्याने तिची देखभाल करण्यासाठी त्यांनी दिबा शेख या महिलेस केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते.

८ सप्टेंबर २०२५ पासून ती त्यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करत होती. त्यांची मुलगी शाळेत तर त्यांच्यासह त्यांचा मुलगा कामावर गेल्यावर दिबा ही त्यांच्या पत्नीसोबत एकटीच घरी राहत होती. त्यांनी त्यांच्या बेडरुम, हॉल, किचन आणि पुढील दरवाजा आदी ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावले आहेत. २२ जूनला व्यकंटेश गोमतम हे नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी दिबा ही एकटीच घरी होती. ती काय काम करते म्हणून त्यांनी सहजच मोबाईलवर मास्तर बेडरुमचा कॅमेरा पाहिला. त्यात त्यांना दिबा ही त्यांच्या कपाटातील लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोसायटीचा मित्र दिपक गुप्ता यांना ही माहिती दिली होती. काही वेळानंतर ते त्यांच घरी आले होते. तोपर्यंत दिपक गुप्ता हा पोलिसांना घेऊन त्यांच्या घरी आला होता. यावेळी दिबा ही घरी झोपली होती. तिला उठवून तिला लॉकर उघडण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र तिने उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने व्यकंटेश गोमतम यांच्या घरी गेल्या चार महिन्यांपासून चोरी करत असल्याची कबुली दिली.

त्यांनी कपाटातील विविध सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता तयत त्यांना तीन लाखांचे तीन तोळे वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठी, आठ लाखांची बारा तोळे वजनाचे बारा सोन्याच्या बांगड्या, आठ लाखांचे आठ तोळे नेकलेस पाच लाखांचे पाच तोळ्याचे एक मंगळसूत्र असे २८ लाख रुपयांचे २८ तोळे विविध सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात दिबा शेख हिच्याविरुद्ध सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page