पार्क केलेल्या महागड्या बाईक चोरी करणार्‍या त्रिकुटास अटक

आठ गुन्ह्यांची उकल करुन नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जून २०२६
ठाणे, – ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात पार्क केलेल्या महागड्या बाईकची चोरी करुन सोशल मिडीयावर चोरी केलेल्या बाईक विक्री करणार्‍या एका टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह त्याच्या दोन सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद मनोहर सावंत, भूषण दिगंबर पुरी ऊर्फ राम गोस्वामी आणि सोहेल अब्दुल शेख अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने आठ बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील आठ चोरीच्या बाईकसह सहा मोबाईल, एक टॅब, चौदा सिमकार्ड, इलेक्ट्रीक फ्युज आदी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गेल्या दोन महिन्यांत कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी इस्टेट परिसरात पार्क केलेल्या महागड्या बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत काही तक्रारी प्राप्त होताच त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष पोटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन हांगे, सुनिल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार मनोज सकपाळ, जगदीश पवार, रविंद्र रावते, गोरखनाथ काळे, शरद माळी, संदीप तुपे, किशोर माळी, काळुराम साठे यांनी तपास सुरु केला होता.

या पथकाने हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, मिरारोड, दहिसर, अंधेरी, सांताक्रुज परिसरातील सुमारे सव्वाशे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पोलिसांना दोन आरोपींची ओळख पटली होती. त्यातील एक आरोपी चोरीची बाईक विक्रीसाठी सांताक्रुज परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सोहेल शेख याला ताब्यात घेतले. तपासात सोहेल हा सांताक्रुज येथील राजीवनगर परिसरात राहत असून त्याने तीन बाईक चोरीची कबुली दिली. त्याच्या चौकशीतून या टोळीचा म्होरक्या मिलिंद सावंत आणि त्याचा सहकारी भूषण पुरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांनीही नऊ बाईक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

या तिघांच्या चौकशीत त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण आठ बाईक चोरी केल्या होत्या. या सर्व बाईक हस्तगत करुन पोलिसांनी आठही बाईक चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. मिलिंद आणि भूषण हे दोघेही हिरानंदानी इस्टेट परिसरात हॅण्डल लॉक न केलेले बाईक थोड्या अंतरावर ढकलत नेऊन वायर कटरने बाईक चालू करुन मिरारोड येथे घेऊन जात होते. तीन ते चार दिवस तिथे बाईक ठेवल्यानंतर तिथे कोणीही बाईकचा शोध घेण्यासाठी आली नसल्याची खात्री होताच सोशल मिडीयावर बाईक विक्रीची जाहिरात देत होते. चोरीच्या बाईक सत्तर ते सव्वालाखांमध्ये विक्री करत होते.

या आरोपींकडून आठ बाईकसह मोबाईल, सिमकार्ड, टॅब असा नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मिलिंद सावंत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पपोलीस ठाण्यात सत्तरहून अधिक बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला यापूर्वी वांद्रे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्यात त्याला शिक्षा झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page