आर्म्स ऍक्टच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस १९ वर्षांनी अटक

जामिनावर बाहेर येताच पळाला व राजस्थानात सापडला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जून २०२६
मुंबई, – आर्म्स ऍक्टच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस १९ वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कालुसिंग देवीसिंग राजपूत असे या ४० वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता, अखेर त्याला १९ वर्षांनंतर राजस्थानातून अटक करण्यात पोलिसांना यश आले. तिथेच तो एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

जानेवारी २००७ रोजी कालूसिंग राजपूत याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घातक शस्त्रांसह अटक केली होती. इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून तो मुंबई शहरात विक्री करत होता. ही माहिती मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याच्याकडून घातक शस्त्रे पोलिसांनी जप्त केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता.

खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टाने जामिननामा काढला होता. त्याचा गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करुन त्याची माहिती काढली जात होती. त्यात पोलिसांना यश आले नव्हते. त्याच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर त्यात त्याचा पूर्ण नव्हता, त्याचा कुठलाही फोटो पोलिसांकडे उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत होता.

तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच तो राजस्थानात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नार्वेकर, पोलीस हवालदार तुपे, बैलकर आदीचे एक पथक राजस्थानात पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजस्थानच्या प्रतापगड, बाराडिया परिसरातील राहत्या घरातून कालूसिंगला तब्बल अठरा तास सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याची दोन दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांड घेण्यात आली होती. मुंबईत पुढील चौकशीसाठी आणल्यानंतर त्याला पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आर्म्स ऍक्टच्या गुन्ह्यांतील तब्बल १९ वर्षांनी अटक करणार्‍या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page