39 वर्षांच्या व्यक्तीची गोळीबारासह घातक शस्त्रांची वार करुन हत्या
पूर्ववैमस्नातून हत्या करणार्या तिन्ही मारेकर्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – पूर्ववैमस्नातून एका 39 वर्षांच्या व्यक्तीची तीनजणांच्या टोळीने गोळीबारासह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या हल्ल्यात बाबा मल्लप्पा पवार याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तिन्ही मारेकर्यांना अटक केली आहे. त्यात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इतर दोन आरोपींमध्ये अभिजीत किशोर जाधव आणि दिनेश दिपक पवार यांचा समावेश आहे. अटकेनंतर या दोघांनाही कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी 29 एप्रिलला रात्री पावणेदहा वाजता कुर्ला येथील ब्लॉक क्रमांक तीन, खोली क्रमांक 118 मध्ये घडली. राजू मल्लप्पा पवार हा कुर्ला येथील हलावपुल, जयशंकर चौक परिसरात राहत असून मुकादम म्हणून काम करतो. मृत बाबा हा त्याचा लहान भाऊ आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणार्या गाडीवर काम करतो. आरोपी आणि बाबा एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या परिचित होते. त्यांच्यात एक जुना वाद होता. याच वादातून बुधवारी रात्री अभिजीज जाधव, दिनेश पवार आणि अल्पवयीन आरोपीने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता.
याच वादातून त्याने त्याच्यावर गोळीबार केला होता. तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केला होता. त्यात बाबा हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राजू पवार याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना अभिजीत जाधव, दिनेश पवार आणि अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर अभिजीत आणि दिनेशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.