मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉर्न्स्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीस अखेर वनराई पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. महेश हिरो खेमलानी ऊर्फ मार्क असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी गुन्हा दाखल होताच महेश हा थाईलंडला पळून गेला होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. गुरुवारी रात्री उशिरा थाईलंड येथून मुंबईत परत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणात महेश हा मुख्य आरोपी असल्याने त्याच्या अटकेने ड्रग्जशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला तो बारावा आरोपी आहे.
गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा अतिसेवन केल्यानंतर दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वनराई पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, दारुबंदी अधिनियम आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यांत अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे, आनंद लक्ष्मण पटेल, विनित सुनिल गेरेलानी, शुभ रामलखन अग्रवाल, आयुष विकी साहित्य, प्रदीप अरविंदकुमार गुप्ता, जिया रेचल प्रदीप जेकब आदींचा समावेश होता. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून महेश खेमलानी याचे नाव समोर आले होते. या कटातील तोच मुख्य आरोपी तसेच त्याने आरोपींना ड्रग्ज पुरविल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना महेश हा थाईलंड येथे पळून गेल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुक आऊट नोटीस जारी केले होते. गुरुवारी रात्री उशिरा महेश हा थाईलंड येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याची माहिती नंतर वनराई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वनराई पोलिसांच्या एका विशेष पथकाने महेश खेमलानीला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतच्या तपासात महेश याचे याप्रकरणात अटकेत असलेल्या जिया जेकबशी प्रेमसंबंध होते. जिया ही कलाकार असून ती महेशसोबत मिरारोडच्या हटकेश रोड, जीसीसी क्लब, लोधा कासा मॅक्सिमा, टॉवर क्रमांक तीनच्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होती. जियाचे एका खाजगी बँकेचे खाते असून ते बँक खाते जियासोबत महेश वापरत होता. या बँक खात्यात आतापर्यंत 40 ते 50 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. ही रक्कम तिच्या बँकेत कोणत्या व्यवहारातून जमा झाली होती याबाबत तिने काहीच माहिती दिली नव्हती. या व्यवहाराची माहिती महेशकडे असल्याने त्याची या प्रकरणात चौकशी होणार आहे. महेश हा ड्रग्ज विक्रीचा मुख्य सूत्रधार असून त्यानेच इतर आरोपींच्या मदतीने ड्रग्जचे वितरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या ड्रग्जचे पेसे जियाच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात होते. महेशला कोण ड्रग्ज देत होता, ते ड्रग्ज कोठून आणले जात होते, त्याचा ड्रग्ज बनविण्याचा स्वतचा कारखाना आहे की तो स्वत ड्रग्ज बनवितो. जियाच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पोलिसांना प्राप्त झाले आहे, त्यात 40 ते 50 लाखांचे आर्थिक व्यवहार झाले आहे, याबाबत त्याची चौकशी होणार आहे. ड्रग्जच्या गुन्ह्यांत महेशचे इतर कोणीही सहकारी आहेत का, महेश हा विदेशातील हाँगकाँग येथील रहिवाशी असू त्याचा इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे.
या व्यवसायाच्या माध्यमातून त्याने भारतासह विदेशात ड्रग्ज पाठविले होते किंवा विदेशातून त्याच्या सांगण्यावरुन ड्र्रग्ज आणले जात होते का, या ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचा सहभाग आहे का याचा तपास सुरु आहे. त्यामुळे इतर आरोपींसोबत महेशची लवकरच समोरासमोर चौकशी होणार आहे. महेशच्या घराची लवकरच पोलिसांकडून झडती घेतली जाणार आहे. या कटातील तो मुख्य आरोपी असल्याने त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.