अज्ञात महिलेच्या हत्येचा 24 तासांत पर्दाफाश करण्यात यश

रस्त्यावर लघुशंका करण्यावरुन शिवीगाळ केली म्हणून हत्या केली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – वांद्रे येथे बेवारस सापडलेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीस शिताफीने अटक केली. भानुदास विठ्ठल कांबळे असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी आहे. रस्त्यावर लघवी करण्यावरुन शिवीगाळ केली म्हणून त्याने वयोवृद्ध महिलेची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मृत महिलेचे नाव सौभाग्यअम्मा हनंमता कथीम्युनर (78) असून ती धारावीतील शाहूनगर परिसरातील रहिवाशी आहे. अटकेनंतर भानुदासला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी 27 एप्रिलला सकाळी सात वाजता वांद्रे येथील आरएनए इमारतीजवळील फुटपाथवर एक अज्ञात महिला बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून खेरवाडी पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठही पाठविला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात या महिलेची डोक्यात आणि कपाळावर जड वस्तूने मारहाण करुन तसेच नंतर गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

मृत महिलेची ओळख पटली नव्हती, त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. दुसरीकडे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता. यातील एका फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती तिथे फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी भानुदास कांबळे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात भानुदास हा ठाण्यातील वर्तकनगर, राधाकृष्ण मंदिराजवळील चिर्लेकर चाळीत राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. गुन्ह्यांच्या दिवशी तो कामानिमित्त वांद्रे येथे आला होता. काम संपल्यानंतर तो त्याच्या घरी जात होता. आरएनए इमारतीशेजारी लघुशंका करत असताना या महिलेने त्याला शिवीगाळ केली होती.

त्याचा राग आल्याने त्याने तेथील विट तिच्या डोक्यात मारली होती, नंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तो पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दुसरीकडे या महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरु असताना तिची शाहूनगर पोलिसांत मिसिंग तक्रार असल्याचे उघडकीस आले. मृत महिलेचे नाव सौभाग्यअम्मा कथीम्युनर असल्याचे उघडकीस आले. ती धारावीतील शाहूनगर परिसरात राहत होती. 27 एप्रिलला ती वांद्रे येथे आली होती. फुटपाथवर झोपली असता तिचे आरोपी भानुदाससोबत लघवी करण्यावरुन वाद झाला होता, या वादानंतर त्याने तिची हत्या करुन पलायन केले होते.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे, पोलीस शिपाई समीर कांबळे, महेश पाटील, सागर गायकवाड यांनी 24 तासांत गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page