ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या कंत्राटी कर्मचार्‍याला अटक

एमआरआयमधील जमा झालेली कॅश चोरी केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणार्‍या रोहित अनिल भोसले याला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हॉस्पिटलच्या एमआरआय विभागात पेशंटकडून जमा झालेली सुमारे 76 हजाराची कॅश चोरी केल्याचा आरोप आहे. रोहित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पनवेल पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद आहे. दारुसह मौजमजेसाठी त्याने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नमिता श्याम वर्मा ही तक्रारदार महिला मालाड येथे राहते. सध्या ती जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या एमआरआय विभागात क्रस्ना डायग्नोस्टिक कंपनीमार्फत मॅनेजर म्हणून काम पाहते. या कंपनीने एमआरआय विभागात रिसेप्शनिस्ट, हाऊसकिपिंग आणि इतर कामासाठी काही कंत्राटी कामगारांना ठेवले होते. त्यात रोहित भोसलेसह इतर पाच कर्मचार्‍याचा समावेश होता. त्यांच्यावर काम पेशंटकडून एमआरआयची कॅश घेऊन ती लॉकरमध्ये ठेवणे, त्याचे हिशोब ठेवून ती कॅश बँकेत जमा करणे आदी जबाबदारी होती. 14 एप्रिलला रश्मी डे या महिलेने रोहित भोसलेने एमआरआय विभागात काम करताना दिवसभराची 76 हजार 700 रुपयांची कॅश जमा केली नाही. कॅश जमा न करता तो घरी निघून गेल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिने रोहितला कॉल करुन विचारणा केली होती. यावेळी त्याने कॅश उद्या जमा करतो असे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार नमिताने तिच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितला होता. दुसर्‍या दिवशी नमिता ही नेहमीप्रमाणे कामावर आली होती. तिने रोहितची चौकशी केली असता तो कामावर आला नव्हता. त्यामुळे तिने त्याला कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने त्याला व्हॉटअप मॅसेज करुन कॅशविषयी विचारणा केली. मात्र त्याने तिच्या मॅसेजला उत्तर दिले नाही. त्याने कॅश जमा न केल्याने वरिष्ठांच्या आदेशानंतर नमिता वर्माने जोगेश्वरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रोहित भोसलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

तपासात रोहित हा पूर्वी नवी मुंबईत होमगार्डमध्ये काम करत होता. तिथेच त्याने चोरी केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रोहित हा पनवेलच्या तपोवन, सुकापूरच्या सहारा कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारुसह मौजमजेसाठी त्याने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page