जुने नाणी विकण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेची फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन भामट्यांना राजस्थानातून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – जुने नाणी विकण्याचा बहाण्याने एका वयोवृद्ध महिलेची 19 लाखांची फसवणुक करणार्‍या दोन भामट्यांना राजस्थान येथून चुन्नाभट्टी पोलिसांनी अटक केली. साहिल फकीरउद्दीन आणि इन्सालिम फकीरउद्दीन अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशा प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने फसवणुकीचे अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने सोमवार 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गौरी सुहास शंभू ही 75 वर्षांची वयोवृद्ध महिला चुन्नाभट्टी परिसरात राहते. 24 मे 2025 ते 25 मार्च 2026 याकालावधती तिला वेगवेगळ्या मोबाईलवरुन अज्ञात व्यक्तींनी कॉल केले होते. अनिलकुमार आणि संजयकुमार नाव सांगणार्‍या व्यक्तींनी ते दोघेही ओल्ड कॉईन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तिला जुन्या भारतीय नाण्यांच्या बदल्यात पन्नास ते साठ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. या नाण्याचे व्हॅल्युएशन आणि इतर टॅक्स भरण्याचा बहाणा करुन तिच्याकडून टप्याटप्याने 18 लाख 98 हजार 650 रुपये घेतले होते. मात्र जुन्या नाण्याच्या मोबदल्यात तिला पैसे दिले नाही, तिची संबंधित अज्ञात व्यक्तींनी फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच तिने चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्यूंजय हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुंडकर, पोलीस हवालदार कोळसे, बनकर, पोलीस शिपाई विश्वजीत पाटील यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यात आली होती.

तांत्रिक माहितीवरुन संबंधित आरोपी राजस्थान येथून ही फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलीस टिम राजस्थानच्या खैरथलं परिसरात गेले होते. या आरोपींची माहिती काढत असताना पोलिसांनी साहिल आणि इन्सालिम फकीरउद्दीन या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेच्या कारवाईच्या वेळेस ते दोघेही अशाच प्रकारे इतरांना कॉल करुन फसवणुक करत असल्याचे दिसून आले.

अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या कॉईनच्या मोबदल्यात भरमसाठ कमिशन देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत. त्यांच्या अटकेने काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page