विदेशातील उच्च शिक्षणासाठी मदतीच्या बहाण्याने अनेकांना गंडा

पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – विदेशातील उच्च शिक्षणासाठी मदतीच्या बहाण्याने फसवणुक करुन कांदिवलीतील कंपनीचे कार्यालय बंद करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपी महिलेस पाच महिन्यानंतर चारकोप पोलिसांनी अटक केली. श्रद्धा विठ्ठल गाडेकर असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत कंपनीचे मालक आणि संचालक स्टेला राकेश मेहता आणि तिचा पती राकेश मेहता सहआरोपी असून या दोघांविरुद्ध मुंबईसह ठाण्यात अशाच प्रकारच्या काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते. या दोघांनी अनेक विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

52 वर्षांचे तक्रारदार नेहल कानू जोशी हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील लोखंडवाला टाऊनशीप परिसरात राहतात. त्यांना एक मुलगी असून तिच्यासह तिच्या मित्राला मास्टर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड लॉजिस्टिकमध्ये नेंदरलँडच्या व्हिटनबर्ग युनिव्हरसिटीमध्ये प्रवेश हवा होता. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन विदेशात शिक्षणासाठी मदत करणार्‍या कंपनीची माहिती सर्च केल होती. त्यात त्यांना कॅरिअर अ‍ॅण्ड ऑप्शन नावाच्या एका कंपनीची माहिती मिळाली होती. ही कंपनी स्टेला मेहता हिच्या मालकीची होती. त्याचे कार्यालय कांदिवलीतील चारकोप, साईप्रेम सोसायटीमध्ये होते.

ऑक्टोंबर 2023 त्यांची मुलगी आणि तिचा मित्र तिथे गेले होते. तिथेच त्यांची स्टेला मेहता, तिचा पती राकेश मेहता आणि श्रद्धा गाडेकरशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना त्यांची कंपनी इच्छुक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विदेशात पाठविण्यासाठी मदत करत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यासाठी एका विद्यार्थ्याला 26 हजार 470 युरो म्हणजेच 26 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. ही माहिती मुलीकडून समजताच नोव्हेंबर 2023 रोजी डॉ. नेहल जोशी हे त्यांच्या पत्नीसोबत कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तिथे या तिघांनी त्यांना विदेशात शिक्षणासाठी जाण्याची पूर्ण प्रक्रिया आणि त्यासाठी लागणार्‍या फीची माहिती दिली. ही रक्कम त्यांच्या कंपनीत जमा करावी लागेल, त्यानंतर फीची रक्कम कंपनीकडून संबंधित नेदरलँडच्या शैक्षणिक संस्थाना पाठविण्यात येईल असे सांगितले.

त्यांची फी जास्त असल्याने त्यांनी त्यांना बँकेतून शैक्षणिक कर्ज घ्यावे लागेल असे सांगून त्यांना मदत करण्याची विनंती केली. यावेळी स्टेला आणि राकेश मेहता यांनी त्यांच्या कंपनीसोबत एका बँकेचे टाईप असून त्यांना शैक्षणिक कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी एका व्यक्तीची भेट घेतली होती. त्याने त्यांना कर्जासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना 33 लाखांचे कर्ज मंजूर करुन दिले होते. कर्जाची रक्कम मंजूर होताच त्यांनी स्टेला मेहताच्या सांगण्यावरुन कंपनीच्या बँक खात्यात 1 ऑगस्ट 2024 रोजी 10 लाख तर 2 ऑगस्टला 10 लाख 34 हजार 290 रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र पेमेंट करुनही त्यांनी तिला विदेशात शिक्षणासाठी पाठविले नाही.

काही दिवसांनी त्यांच्या मुलीला व्हिटनबर्ग युनिव्हरसिटीमधून कॉल आला होता. त्यात तिची फी जमा झाली नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार समजताच त्यांनी कांदिवलीतील कार्यालयात जाऊन स्टेला, राकेश आणि श्रद्धाकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीचे दुसर्‍या संस्थेशी बोलणी झाल्याचे सांगून तिथे तिची फी भरल्याचे सांगितले. काही दिवसांनी ते तिघेही कांदिवलीतील कार्यालय बंद करुन पळून गेले होते. चौकशीदरम्यान या तिघांनी अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविण्यास मदत करण्याची बतावणी करुन त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन फसवणुक केली होती.

यातील स्टेला आणि राकेश मेहता यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजले होते. त्यामुळे डॉ. नेहल जोशी यांनी घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगून तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्टेला मेहता, राकेश मेहता आणि श्रद्धा गाडेकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या श्रद्धा गाडेकर हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या टोळीने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांची फसवणुक केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page