हेव्ही डिपॉझिटच्या तेरा लाखांचा अपहार करुन महिलेची फसवणुक
मध्यस्थी करणार्या दलालास अटक तर फ्लॅटमालकाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून एका महिलेकडून घेतलेल्या तेरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अब्दुल रज्जाक शेख ऊर्फ डाबला नावाच्या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत फ्लॅटमालक शब्बीर हद्दीश शेख ऊर्फ पप्पू हा सहआरोपी असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. तक्रारदार महिला आणि शब्बीर यांच्यात फ्लॅट व्यवहारात अब्दुल शेख याने मध्यस्थी करुन तिची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साबेरा बाबू सोलंकी ही 50 वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे तिच्या पती आणि मुलासोंबत राहते. तिचा होलसेलमध्ये अंडी विक्रीचा व्यवसाय आहे तर तिचे पती रिक्षाचालक म्हणून काम करतात. तिची कांदिवलीतील अपनानगर, इब्राहिम आदम चाळीत एक रुम असून ही जागा एसआरएमार्फत होणार्या पुर्नविकासात तुटणार होती. त्यामुळे ती ऑक्टोंबर 2025 पासून भाड्याच्या फ्लॅटचा शोध घेत होती. अब्दुल शेख हा तिच्या पतीचा मित्र असून तो अधूनमधून त्यांच्या घरी येत होता.
ही माहिती अब्दुलला समजताच त्याने तिला त्याचा मित्र शब्बीर याचा कांदिवलीतील बाणडोंगरी, सुमुख हिल्स इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे. त्याला त्याचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे, त्यामुळे त्याच्याच फ्लॅटमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करतो असे सांगितले होते. त्यामुळे साबेरा सोलंकी ही तिच्या पती आणि मुलांसोबत शब्बीरला भेटण्यासाठी त्याच्या सुमुख इमारतीच्या बी/1307 या फ्लॅटमध्ये गेले होते. त्याने त्याचा त्याच इमारतीमध्ये अकराव्या मजल्यावर एक फ्लॅट असल्याचे सांगून त्यांना तो फ्लॅट दाखविला होता.
या फ्लॅटमध्ये दुसरा भाडेकरु राहत होता. चौकशीदरम्यान त्याने तो फ्लॅट त्यांनी शब्बीरकडून घेतल्याचे सांगितले. हा फ्लॅट आवडल्याने त्यांनी त्याच्याकडून तोच फ्लॅट तेरा लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे तिने शब्बीरला कॅशमध्ये तीन लाख तर दहा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांत फ्लॅटचा ताबा देतो असे शब्बीरने सांगितले होते, मात्र त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. ठरल्याप्रमाणे तो फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर लावत होता, त्यामुळे तिने त्याच्याशी केलेला व्यवहार रद्द करुन हेव्ही डिपॉझिट म्हणून दिलेल्या तेरा लाखांची मागणी सुरु केली होती.
मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा हेव्ही डिपॉझिटची रक्कमही परत केली नाही. अब्दुल शेख आणि शब्बीर शेख यांनी संगनमत करुन हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून तिची तेरा लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अब्दुल शेख आणि शब्बीर शेख या दोघांविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटच्या तेरा लाखांचा अपहार करुन तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते.
अखेर दिड महिन्यानंतर अब्दुल शेख ऊर्फ डाबला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत शब्बीर शेखला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.