व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने पोलीस कर्मचार्याची फसवणुक
35 लाखांच्या फसवणुकीप्रकणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – नवीन व्यवसायात पार्टनरशीपची ऑफर करुन गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका पोलीस कर्मचार्याची पती-पत्नीने सुमारे 35 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी जोडप्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पंकज मसंद आणि नम्रता पंकज मसंद अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध फ्लॅट फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचे बोलले जाते.
यातील तक्रारदार वरळीतील सर पोचखानावाला रोड, वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहत असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची पंकज मसंदशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो व्यावसायिक असून त्याच्या मालकीचे गोवा येथे एक कसिनो आहे. त्यात त्याचा एक पार्टनर असून त्याला या व्यवसायातून प्रचंड फायदा होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही नियमित भेटत होते, त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. मसंद कुटुंबिय कुलाबा येथे राहत असून ते अनेकदा त्यांच्या घरी जात होते. याच दरम्यान पंकजने त्यांना तो जियाराम इंटरप्रायजेस नावाची एक नवीन कंपनी सुरु करणार असून या कंपनीत त्यांनी गुंतवणुक करावी.
कंपनीत पार्टनरशीप तसेच गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची पत्नी उच्चशिक्षित असल्याने तिला उत्पनाचा स्त्रोत चालू होईल म्हणून त्यांनी तिच्या नावाने पंकजच्या कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी ऑक्टोंबर 2023 रोजी पोलीस सोसायटीमधून 5 लाख 62 हजार तर फेब्रुवारी 2024 रोजी 7 लाख 36 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रक्कमेसह कॅश स्वरुपात काही रक्कम त्यांनी पंकजला गुंतवणुकीसाठी दिले होते. या कंपनीत पंकजची पत्नी नम्रता व त्यांची पत्नी पार्टनर होते. काही दिवसांनी त्यांनी कंपनीचे काम सुरु केले होते. त्यासाठी तिथे दोन कर्मचार्यांना कामावर ठेवले होते. तक्रारदाराची पत्नी आठवड्यातून दोन वेळा तिथे जात होती.
कंपनीचा जम बसण्यास वेळ लागत असल्याचे सांगून पंकजने काही रक्कम त्याच्या गोव्यातील कंपनीत गुंतवणुक केली होती. त्यात त्याचे पैसे अडकल्याने त्याने त्यांना आणखीन कर्ज काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने गहाळ त्याला व्यवसायासाठी पैसे दिले होते. दोन वर्षांत त्यांनी पंकज आणि नम्रताला पोलीस सोसायटीमधून 12 लाख 93 हजार रुपये दिले होते, त्यासाठी त्यांनी 3 लाख 30 हजार रुपयांचे कर्जाचे हप्ते भरले होते. सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांना अकरा लाख रुपये तर कॅश स्वरुपात आठ लाख रुपये असे 35 लाख 23 हजार रुपये दिले होते.
मात्र या दोन वर्षांत त्यांनी त्यांना व्यवसायातून त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. याच दरम्यान त्यांना पंकज आणि नम्रता हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीत एका महिलेची फसवणुक केली आहे. याबाबत त्यांच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले होते. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने त्यांच्याकडे व्यवसायासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र ते दोघेही आज-उद्या करुन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
एकच मॅसेज पुन्हा पुन्हा पाठवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पंकज मसंद आणि नम्रता मसंद या आरोपी पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.