ऑनलाईन सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

45 वर्षांच्या वेश्यादलाल महिलेस अटक तर दोन तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – अंधेरी आणि साकिनाका परिसरातील विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार अल्पवयीन मुलीसह तरुणींना शारीरिक संबंधासाठी पाठवून ऑनलाईन सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका 45 वर्षांच्या वेश्यादलाल महिलेस अटक केली आहे. उपासना ऊर्फ आरती असे या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहते. तिच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपासना ऊर्फ आरती नावाची नावाची एक महिला घाटकोपर येथे राहत असून ती मोबाईलवरुन ग्राहकांना अंधेरी, साकिनाका परिसरातील विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलींसह तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून आरतीला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची विशेषता अल्पवयीन मुलींची शारीरिक संबंधासाठी मागणी केली होती. यावेळी तिच्याकडे सध्या मुली उपलब्ध असल्याचे सांगून एका मुलीमागे आठ हजाराच्या मोबदल्याची मागणी केली होती.

यावेळी बोगस ग्राहकाने तिला मुलीचे फोटो व्हॉटअपवर पाठविण्यास सांगितले. तिनेही मुलीचे फोटो पाठविले होते. बोगस ग्राहकाकडून होकार येताच तिने त्याला अंधेरीतील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता बोगस ग्राहक तिथे गेला होता. काही वेळानंतर तिथे उपासना ऊर्फ आरती ही दोन तरुणींसोबत आली होती. यावेळी त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरु होता. याच दरम्यान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अनिता कदम, सहाय्यक फौजदार घोसाळकर, महिला पोलीस हवालदार सुवर्णा पाटील, हर्ळणकर, समाजसेवा शाखेचे पोलीस हवालदार बने, जापूचे शाखेचे सहाय्यक फौजदार जेडगुले, पोलीस शिपाई साळुंखे आदी पथकाने तिथे छापा टाकून उपासना ऊर्फ आरतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत ही मोबाईलवरुन सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या संपर्कात काही तरुणीसह अल्पवयीन मुली होत्या. या अल्पवयीन मुलींसह तरुणींना ती विविध ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी वेगवेगळ्या हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत असल्याचे उघडकीस आले. तिच्यासोबत आलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीत त्या दोघीही उपासना ऊर्फ आरतीच्या सांगण्यावरुन तिथे ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी आल्याचे सांगितले. त्यासाठी तिच्याकडून तिला पाच हजार रुपये दिले जात होते, उर्वरित तीन हजार आरती ऊर्फ उपासना ही स्वतकडे ठेवत होती.

तपासात आलेल्या या माहितीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या दोन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत नूरी ऊर्फ नसरीन या महिलेचा सहभाग उघडकीस आल्याने तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page