वयोवृद्धाच्या घरी घरफोडी करणारा सराईत आरोपी गजाआड
उच्चभू इमारतीच्या फ्लॅटमध्ये घरफोडी करत असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – देवदर्शनासाठी इंदोरला गेलेल्या गोरेगाव येथील एका वयोवृद्धाच्या घरी घरफोडी करुन पळून गेलेल्या एका सराईत आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. परशुराम विकास शेंडगे असे या 42 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यांतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. परशुराम हा उच्चभू इमारतीच्या फ्लॅटमध्ये चोरी करत असल्याचे उघडकीस आले असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील ओशिवरा, विलेपार्ले, बांगुरनगर आणि गुन्हे शाखेत एकूण दहा घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कृष्णन शंकर अय्यर हे 73 वर्षांचे वयोवृद्ध त्यांची पत्नी वासंतीसोबत गोरेगाव येथील बांगुरनगर, हरिरत्न सोसायटीमध्ये राहतात. महिंद्रा कंपनीतून ते निवृत्त झाले आहे. त्यांचा मोठा कार्तिक पुणे तर लहान मुलगा कौशिक हा विदेशात वास्तव्यास आहे. 7 एप्रिलला ते त्यांच्या पत्नीसोबत इंदौरच्या ओकांरेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील विविध सोन्याचे दागने आणि कॅश असा 10 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. 9 एप्रिलला कृष्णन अय्यर हे मुंबईत परत आले होते. घरी आल्यानंतर त्यांना सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांना विविध सोन्याचे दागिने आणि कॅश चोरीस गेल्याचे दिसले होते. त्यामुळे त्यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन बांगुरनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, पोलीस शिपाई नितीन दळवी, मिथुन गावीत, निशिकांत शिंदे, केतके, हरगुडे आणि जाधव यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी परशुराम शेंडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल त्याने त्याच्या राहत्या घरी ठेवला होता. त्यांनतर या पथकाने त्याच्या गोरेगाव येथील ओशिवरा बस डेपो, कन्याकुमारी, कृष्णा इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ए/4 मधून चोरीचे सर्व दागिने आणि कॅश असा दहा लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तपासात परशुराम हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात पाच, विलेपार्ले पोलीस ठाण्यात तीन आणि गुन्हे शाखेत एक अशा नऊ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच घरफोडीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.