गोल्ड लोन क्लोज करण्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार
फसवणुकीच्या गुन्ह्यांत 35 वर्षांच्या मैत्रिणीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मंबई, – गोल्ड लोन क्लोज करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या सही केलेला धनादेश मैत्रिणीने कंपनीत जमा न करता स्वतचे नाव आणि रक्कम टाकून 4 लाख 78 हजाराचा अपहार करुन फसवणुक केली, याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच दिपिका मनोज शेट्टी या 35 वर्षांच्या आरोपी मैत्रिणीला एक महिन्यानंतर समतानगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. मैत्रिणीने विश्वासघात केल्याने तक्रारदार महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
स्वप्नाली अभिजीत डांगे ही महिला कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहते. ती एका खाजगी कंपनीत तर तिचे पती अकाऊंटट म्हणून काम करतात. जानेवारी 2025 रोजी तिच्या भावाला घर घ्यायचे होते, त्यामुळे त्याने तिच्याकडे आर्थिक मदत मागितली होती. पैसे नसल्याने तिने एका खाजगी वित्त पुरवठा कंपनीत सोने तारण ठेवून कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने ठाकूर कॉम्प्लेक्समधील एका कंपनीत तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून पाच लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी कंपनीने तिला 24 टक्के वार्षिक व्याजदाराने 4 लाख 65 हजाराचे सोने तारण कर्ज दिले होते.
ही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होताच तिने ती रक्कम तिच्या भावाला पाठवून दिली होती. भावाकडून पैशांची व्यवस्था होताच त्याने तिला तिचे पैसे पाठवून दिले होते. त्यामुळे पैसे भरुन तिने सोने सोडविण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान तिची दिपिका शेट्टीशी भेट झाली होती. दिपिका ही तिची गेल्या पाच वर्षांपासून मैत्रिण होती. ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. तिच्या शेजारीच संबंधित कंपनीत असल्याने तिने तिला गोल्ड लोन क्लोज करण्यासाठी कंपनीत धनादेश टाकण्यासाठी दिला होता. यावेळी तिने धनादेशावर केवळ सही केली होती.
त्याचा गैरफायदा घेऊन दिपिकाने धनादेशावर स्वतचे नाव आणि 4 लाख 78 हजार 600 रुपयांची रक्कम टाकून ती रक्कम स्वतच्या बँक खात्यात वळवून घेतली होती. दिपिकाच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचा बँकेचा मॅसेज नंतर स्वप्नानी डांगेला आला होता. हा मॅसेज पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे विचारणा करुन तिला जाब विचारला होता. यावेळी तिने एक-दोन दिवसांत पैसे देते असे सांगितले, मात्र तिने तिला पैसे दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तिने पैसे दिले नाही.
विश्वासानाने दिलेल्या धनादेशावर स्वत नाव टाकून दिपिकाने तिच्या 4 लाख 78 हजाराचा अपहार केला होता. या घटनेनंतर तिने तिच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिपिका शेट्टीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तिला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.