मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मुंबई, – सहा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर शाळेच्या शिपायानेच लैगिंक चाळे केल्याची धक्कादायक घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 45 वर्षांच्या शाळेच्या आरोपी शिपायाला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. खाजगी शाळेतील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
37 वर्षांचे तक्रारदार गोवंडी परिसरात राहतात. बळीत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा असून गोवंडीतील एका खाजगी शाळेत शिकतो. याच शाळेत आरोपी शिपाई म्हणून काम करतो. त्याच्यावर लहान मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत बळीत मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेत असताना आरोपीला त्याला एका रुममध्ये नेले होते. त्याच्याशी लगट करुन त्याच्याशी अश्लील चाळे केले होते. त्याच्यावर लैगिंक हल्ला केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याला धमकी दिली होती. त्यामुळे त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
अलीकडेच त्याने त्याच्या तक्रारदार पित्याला शाळेत घडलेला प्रकार सांगितला होता. शाळेत घडलेल्या या प्रकाराने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिपायाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी शिपायाला गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा प्रभादेवी परिसरात राहत असून गेल्या काही वर्षांपासून शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. ही घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत शाळेत घडली होती, मात्र अलीकडेच बळीत मुलाने त्याच्या पित्याला हा प्रकार सांगितला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने शाळेतील शिक्षक, पालक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.