प्रेमप्रकरणातून तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या
हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – प्रेमप्रकरणातून अशुकुमार अनिल सिंग या 29 वर्षीय सुरक्षारक्षक तरुणाची त्याच्याच सहकार्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या केली. हत्येप्रकरणी अभिषेककुमार सिंग या आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध माटुंगा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशुकुमार आणि अभिषेककुमार हे दोघेही एका तरुणीच्या संपर्कात होते, मात्र अशुकुमार हा तिच्याशी मोबाईलवर जास्त वेळ संभाषण करत असल्याने त्याने रागाच्या भरात ही हत्या केल्याचे बोलले जाते.
सर्वेशकुमार अनिल सिंग हा मूळचा बिहारच्या बराडी, कांतनगरचा रहिवाशी असून सध्या तो ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहतो. ताडदेवच्या महानगरपालिका, डी वॉर्डमध्ये तो स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या वतीने सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याची आई आणि एक भाग गावी राहतात तर अशुकुमार हा मोठा भाऊ वडाळा येथील जी. डी आंबेकर मार्ग, जीडीबी कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. शनिवारी रात्री सव्वाअकरा वाजता तो त्याच्या मित्रासोबत जेवत होता. यावेळी त्याला त्याच्या परिचित अलोककुमार सिंगचा फोन आला होता. जीडीबी कन्स्ट्रक्शन साईटवर अभिषकुमार सिंग हा त्याचा भाऊ अशुकुमारला मारहाण करत आहे. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे अशी माहिती दिली.
या माहितीनंतर तो त्याच्या मित्रासोबत वडाळ्यातील बांधकाम साईटवर गेला होता. तिथे त्याला अशुकुमार हा मारहाणीत गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अशुकुमारला पोलिसांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या तोंडाला, डोक्याला, मानेला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली होती. मारहाणीत तो बेशुद्ध झाला होता. त्याच्याच शेजारी एक लोखंडी रॉड होता. याच रॉडने अशुकुमारला बेदम मारहाण करण्यात आली होती.
याप्रकरणी सर्वेशकुमारची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात अशुकुमार आणि अभिषेककुमार हे दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या गावच्या एका तरुणीच्या संपर्कात होते. या तरुणीसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. अशुकुमार तिच्याशी सतत फोनवर बोलत असल्याने त्याचा अभिषेककुमारला राग होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. शनिवारी रात्री याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर अभिषेककुमारने अशुकुमारची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या केली होती.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अभिषेककुमार हादेखील बांधकाम साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो बिहारच्या भागलपूरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.