प्रेमप्रकरणातून तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या

हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – प्रेमप्रकरणातून अशुकुमार अनिल सिंग या 29 वर्षीय सुरक्षारक्षक तरुणाची त्याच्याच सहकार्‍याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या केली. हत्येप्रकरणी अभिषेककुमार सिंग या आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध माटुंगा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अभिषेककुमारला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशुकुमार हा बहिणीला सतत कॉल करतो याचा राग अभिषेककुमारच्या मनात होता. त्यातून त्याने त्याची हत्या केल्याचे बोलले जाते.

सर्वेशकुमार अनिल सिंग हा मूळचा बिहारच्या बराडी, कांतनगरचा रहिवाशी असून सध्या तो ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहतो. ताडदेवच्या महानगरपालिका, डी वॉर्डमध्ये तो स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या वतीने सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याची आई आणि एक भाग गावी राहतात तर अशुकुमार हा मोठा भाऊ वडाळा येथील जी. डी आंबेकर मार्ग, जीडीबी कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. शनिवारी रात्री सव्वाअकरा वाजता तो त्याच्या मित्रासोबत जेवत होता. यावेळी त्याला त्याच्या परिचित अलोककुमार सिंगचा फोन आला होता.

जीडीबी कन्स्ट्रक्शन साईटवर अभिषकुमार सिंग हा त्याचा भाऊ अशुकुमारला मारहाण करत आहे. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे अशी माहिती दिली. या माहितीनंतर तो त्याच्या मित्रासोबत वडाळ्यातील बांधकाम साईटवर गेला होता. तिथे त्याला अशुकुमार हा मारहाणीत गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अशुकुमारला पोलिसांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या तोंडाला, डोक्याला, मानेला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली होती.

मारहाणीत तो बेशुद्ध झाला होता. त्याच्याच शेजारी एक लोखंडी रॉड होता. याच रॉडने अशुकुमारला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वेशकुमारची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात अशुकुमार हा अभिषेककुमारच्या गावात राहणार्‍या बहिणीच्या संपर्कात होता. तो तिला सतत कॉल करत होता. त्यांच्यात तासनतास संभाषण सुरु होते. ही माहिती अलीकडेच अभिषेककुमारला समजली होती. त्याचा त्याला प्रचंड राग होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते.

शनिवारी रात्री याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर अभिषेककुमारने अशुकुमारची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या केली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेककुमार हादेखील बांधकाम साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो बिहारच्या भागलपूरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page