बाबा सिद्धीकी यांच्या अंगरक्षकावर सेवेतून बडतर्फीची कारवाई

कर्तव्यात बेजबाबदार-निष्काळजीपणा केल्याचा ठपका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी आमदार आणि मंत्री झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांचा अंगरक्षक श्याम मगन सोनावणे याच्यावर पोलीस आयुक्तांनी पोलीस सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो संरक्षण आणि सुरक्षा विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर कर्तव्यात बेजबाबदार आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते, आता त्याच्यावर पोलीस सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

बाबा सिद्धीकी हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री असून त्यांच्याकडे श्याम सोनावणे हा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. 12 ऑक्टोंबर 2024 रोजी बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेच्या वेळेस श्याम सोनावणे तिथे उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त असताना बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीत श्याम सोनावणे यांनी कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करु नये याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती.

याच दरम्यान त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरु होती. या चौकशीत ते दोषी आढळून आले होते. त्यामुळे त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 2 मे 2026 रोजी त्यांना बडतर्फीची कारवाईची नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस दलात अशा प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही असे सक्त आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केला आहे. त्यामुळे आगामी काळात कर्तव्य बजाविताना कोणीही पोलीस अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई होईल असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

कर्तव्यात कसुरी करणार्‍या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई
कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सहा पोलिसांवर पोलीस सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एका फौजदारासह पाच पोलीस शिपायाचा समावेश आहे. नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विलास आनंदा हजारे, पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रहिमान बाबूलाल सय्यद, विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र विठ्ठल दिवटे, भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई उमेश पांडुरंग बांगर, घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अल्तमेश इब्राहिम शेख आणि मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विशाल बापू अशी या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

मुलुंड येथील आनंदनगर, टोलनाका परिसरात संबंधित सहाही पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक होती. 5 एप्रिल 2026 रोजी या पोलिसांनी कर्तव्य बजाविताना कसुरी केली होती. याबाबतची तक्रार वरिष्ठांना प्राप्त होताच त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत सहाही पोलीस कर्मचारी दोषी ठरले होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबनाची नोटीस विलास हजारे, रहिमान सय्यद, राजेंद्र दिवटे, उमेश बांगर, अल्तमेश शेख आणि विशाल पारे यांना 23 एप्रिलला देण्यात आली होती. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे. या चौकशीत ते सर्वजण दोषी ठरल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page