ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरला पंधरा लाखांच्या खंडणीसाठी धमकी
खंडणीसाठी धमकाविणार्या महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या एका डॉक्टरला चारजणांच्या टोळीने पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करुन या टोळीने त्यांना त्यांची बदनामीची धमकी देताना त्यांच्याकडे पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
45 वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून बोरिवलीतील गोराई परिसरात राहतात. त्यांची नेमणूक जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये असून गेल्या एक वर्षांपासून तिथे ते हज पोर्टलच्या नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हज यात्रेसाठी जाणार्या व्यक्तीचे लसीकरण करुन त्यांच्याकडील फिटनेस सर्टिफिकेटची माहिती त्यांच्या लॉन इन आयडीवरील हज पोर्टलवर अपलोड केले जात होते. बुधवारी 6 मेला ते ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये काम करत होते. यावेळी तिथे चारजण आले. त्यात एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश होता. त्यांनी त्यांना त्यांचा एक जुना व्हिडीओ दाखविला. त्यात ते एका कॅफेमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होते. तुम्ही चुकीचे काम करतात. सरकारी काम तुम्ही खाजगी जागेत करु शकत नाही. त्यानंतर ते चौघेही तेथून निघून गेले.
काही वेळानंतर त्यापैकी एक तरुण पुन्हा त्यांच्या केबीनमध्ये आला. त्याने त्याचे सूर्यवंशी सांगून त्यांच्याकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांचा जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. एका तासांत पैशांबाबत सांगा नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगून तो तेथून निघून गेला. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरुन सतत खंडणीसाठी धमकी येत होती. या व्हिडीओची पाहणीदरम्यान त्यांना 8 एप्रिल 2026 रोजी ते काही कामानिमित्त मालाडच्या एका कॅफेमध्ये गेले होते. तिथे ते त्यांच्या लॅपटॉपवर लसीकरणाचे फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांचा व्हिडीओ संबंधित आरोपींनी काढला होता.
हा व्हिडीओ दाखवून ते त्यांच्याकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी करत होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांना ही माहिती दिली होती. त्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात संबंधित चारही आरोपीविरुद्ध ब्लॅकमेल करुन पंधरा लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून लवकरच संबंधित आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.