सुधारणा व्हावी यासाठी पाठविलेल्या मुलांना क्रुर वागणुक

मालवणीच्या रिहाब सेंटरमध्ये चार कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मे 2026
मुंबई, – सुधारणा व्हावी यासाठी पाठविलेल्या अल्पवयीन मुलांना मालाडच्या मालवणी परिसरातील उमंग फाऊंडेशन रिहाब सेंटरममध्ये काही कर्मचार्‍यांकडून अमानुष क्रुर वागणुक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन महिन्यांपूर्वी रिहाब सेंटरमध्ये गेलेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या चौकशीतून हा प्रकार उघड झाला असून त्याच्या तक्रारीनंतर रिहाब सेंटरच्या चार कर्मचार्‍याविरुद्ध मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चारही कर्मचार्‍यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सतरा वर्षांचा तक्रारदार अल्पवयीन मुलगा मिरारोड येथे राहतो. तो घरी आई-वडिल आणि भावाला त्रास देत होता, शिक्षण घेत नव्हता. त्याचे वागणे ठिक नसल्याने त्याच्या भावाने त्याच्यात सुधारणा व्हावी यासाठी रिहाब सेंटरमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्याला मालवणीतील उमंग फाऊंडेशन सेंटरची माहिती समजली होती. चौकशीनंतर त्याने तक्रारदार भावाला तिथे तीन महिन्यासाठी टाकले होते. त्यासाठी 21 हजाराची फि सांगण्यात आली होती, मात्र ही फी जास्त असल्याने त्यांनी त्यांना पंधरा हजार देण्याचे मान्य केले होते. या तीन महिन्यांत त्याला त्याच्या पालकांसह नातेवाईकांना भेटण्यास येणार नव्हते.

ठरल्याप्रमाणे 14 फेब्रुवारीला त्याला उमंग फाऊंनडेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यासोबत साठ ते सत्तर मुले होते. त्यात काही मुले त्याच्यापेक्षा मोठे तर काहीजण लहान होते. तिथे इक्लाक आणि जाकीरहे पेंशट तर मनोज आणि दबंग हे देखरेख करण्याचे काम करत होते. तक्रारदार मुलगा दाखल होताच त्याला सतत क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली जात होती. काहीही मागणी केली असता त्याला शिवीगाळ केली जात होती. मनोज आणि दबंग हे सर्वच मुलांना फायबरच्या पाईपने मारहाण करत होते. दोन महिने उलटूनही त्याच्या भावाने पैसे भरले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला पाठीवर, पायाला व इतर ठिकाणी बेदम मारहाण केली होती.

त्याच्यासह इतर मुलांना अशाच प्रकारे क्रुर वागणुक दिली जात होती. त्यांचे हातपाय बांधून हाताने आणि लाथ्याबुक्यांनी मारहाण केली जात होती. तिथे मुलांना शिवीगाळ करुन मारहाण केली जाते याबाबत कोणालाही सांगू नये म्हणून धमकी दिली जात होती. 6 मेला त्याचा भाऊ तिथे आला होता. यावेळी त्यांनी त्याच्या भावाशी पैशांवरुन वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्याने त्याच्या भावाची भेट घेतल्यानंतर त्याला त्याच्याकडून तिथे होणार्‍या क्रुर वागणुकीची माहिती समजली होती. त्यानंतर त्याने त्याला मालवणी पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना रिहाब सेंटरमध्ये चालणार्‍या मारहाणीची माहिती सांगितला.

त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इक्लाक, जाकीर, मनोज आणि दबंग या चौघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात रिहाब सेंटरच्या इतर काही मुलांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांना तिथे क्रुर वागणुक दिली जात होती का. त्यांचे मानसिक व शारिरीक केले जात होते का याची चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page