घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींना घातक शस्त्रांसह अटक

चार गुन्ह्यांची उकल तर अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन सराईत आरोपींना घातक शस्त्रांसह पार्कसाईट पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. राणू आतिक अहमद अन्सारी आणि प्रशांत अशोककुमार ठाकूर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेने घरफोडीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि घरफोडीसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर त्यांना विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार महिला ५८ वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथील रामनगर, किल्ले शिवनेरी चाळीत राहते. २९ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत रात्रीच्या वेळेस तिच्यासह अन्य एका फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. अज्ञात व्यक्तीने दोन्ही फ्लॅटमध्ये प्रवेश करुन एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच या महिलेसह दोघांनी पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पार्कसाईट पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पार्कसाईट पोलिसांच्या एका विशेष पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी मुंब्रा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलीस निरीक्षक प्रमोद सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हुजरे, पोलीस हवालदार सचिन ढोमसे, दिपक फुफाने, विशाल गवारे, राहुल नवले, पोलीस शिपाई मनोज सुरवाडे, दिपक तायडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

मुंब्रा रेल्वे स्थानकात आलेल्या राणू अन्सारी आणि प्रशांत ठाकूर या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. तपासात ते दोघेही उत्तरप्रदेशच्या इलाहाबाद आणि इटावाचे रहिवाशी असून सध्या ठाणे आणि दादर परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कटावणी, दोन मोठे स्क्रु ड्रायव्हर, दोन एलईडी बॅटरी, दोन मास्क, एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि एक चाकू हस्तगत केला आहे.

या दोघांवर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून घरफोडीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यशआले आहे. गेल्या एका वर्षांत त्यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घरफोडी केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून उर्वरित सहा लाखांचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page