अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपी दोषी

वीस वर्षांच्या कारावासासह तीन हजाराचा दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – मानखुर्द परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील एका आरोपीला विशेष पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून वीस वर्षांच्या कारावासासह तीन हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जहीर झाकीर हुसैन शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला प्रत्येक कलमांत कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. चार वर्षांत या गुन्ह्यांचा निकाल आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहत होती. जहीर हादेखील तिथे राहत असून तो तिच्या परिचित होता. चार वर्षांपूर्वी तिचे आरोपी जहीरने अपहरण केले होते. अपहरणानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला धमकाविले होते. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. नंतर तिने घडलेला प्रकार मानखुर्द पोलिसांना सांगून जहीरविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध नंतर विशेष पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करुन भक्कम पुरावे सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष आदीमुळे कोर्टाने जहीरला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने वीस वर्षांच्या सक्तमजुरीसह तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी शिक्षा होण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मालवे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, धोंडे, गावकर, महिला पोलीस शिपाई पाटील, करांडे, पोलीस शिपाई नुगुरवार यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page