गरीबांसाठी घरांची स्किम असल्याचे सांगून अडीच कोटीची फसवणुक

चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपी महिलेस अटक

0

अरुण सावरटकर
२४ जून २०२६
मुंबई, – अंधेरी येथे गरीबांसाठी बारा लाखांमध्ये फ्लॅट उपलब्ध असल्याची बतावणी करुन फ्लॅटचे बोगस ऍलोटमेंट देऊन अनेकांना सुमारे अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याच्या कटातील एका वॉण्टेड महिला आरोपीस चार वर्षांनी वनराई पोलिसांनी अटक केली. श्‍वेता सिंग ऊर्फ श्‍वेता नवीनसिंग गोरखा ऊर्फ प्रिती सिंग अशी आरोपी महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य आरोपी नवीनसिंग मानसिंग गोरखा याच्यासह इतर आरोपींच्या मदतीने श्‍वेताने महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत आरपीआय, राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकारी, एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे बोलले जात होेते.

चेतन कृष्णा जायगडे हे विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, आंबेवाडी रहिवाशी संघात राहत असून त्यांचा स्वतचा ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. ऑक्टोंबर २०१९ रोजी त्यांची सुभाष पाटील या निवृत्त पोलीस अधिकार्‍यामार्फत नवीनसिंग मानसिंग गोरखा याच्याशी ओळख झाली होती. नवीनसिंग हा राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष आहे. त्याने साई यश इंटरप्रायजेस नावाची एक फर्म तयार करुन त्याद्वारे गरीबांसाठी अंधेरीतील कानकिया, चकाला परिसरात अवघ्या बारा लाखांमध्ये घरांची एक योजना सुरु केली होती. या घरांची त्याने जाहिरात केल्याने त्याला अनेकांनी संपर्क साधला होता. घरासाठी इच्छुक लोकांनी चार लाख रुपयांचा धनादेश आणि पाच लाख रुपये कॅश स्वरुपात द्यावे. घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावे लागेल असे सांगण्यात आले होते.

त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी या स्किममध्ये घर बुक केले होते. त्याला कॅश आणि धनादेशद्वारे पेमेंट केले होते. काही महिन्यांनी त्यांनी स्किममधील सभासदांना विविध शासकीय दस्तावेज दिले होते. याकामी त्याला आरपीआय कांदिवली तालुका अध्यक्ष रवी सरवदे, राष्ट्रवादीचा सरचिटणीस सचिन यादव, धनसिंग गोरखा, मासुम नवीनसिंग गोरखा, श्‍वेता सिंग आदींनी मदत केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी घराचा ताबा दिला नाही. प्रशासकीय कामासह लॉकडाऊनचे कारण सांगून त्याने अनेकांना घराचा ताबा मिळण्यास उशीर होत असल्याचे सांगत होता. हा संशयास्पद वाटताच अनेकांनी संबंधित कागदपत्रांची शहानिशा सुरु केली होती. त्यात नवीनसिंगसह इतरांनी दिलेले कागदपत्रे बोगस असल्याचे काही सभासदांच्या निदर्शनास आले होते.

या प्रकाराने अनेकांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी नवीनसिंगसोबत एक मिटींग आयोजित केली होती. या मिटींगमध्ये नवीनसिंगसह इतर आरोपींनी केवळ फसवणुकीच्या उद्देशाने ही स्किम सुरु करण्यात आली होती. अशा प्रकारची कोणतीही योजना नसून ऐशोआरामासाठी ही रक्कम घेऊन त्यांना खोटी आश्‍वासने देण्यात आल्याची कबुली दिली. तसेच या सर्वांचे पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र कोणालाही पैसे परत केले नाही. घराच्या स्किमच्या नावाने नवीनसिंगसह इतरांनी आतापर्यंत अनेकांकडून अडीच कोटी रुपये घेतले आहे. मात्र कोणालाही घर दिले नाही किंेवा घरासाठी घेतलेले पैसे परत केले नाही.

त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे चेतन जायगडे यांनी १२ जुलै २०२२ रोजी नवीनसिंगसह इतर आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर तीन महिन्यानंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

याच गुन्ह्यांत श्‍वेता सिंग ऊर्फ श्‍वेता गोरखा ही गेल्या चार वर्षांपासून फरार होता. तिचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तिला शनिवारी २० जूनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. श्‍वेताने नवीनसिंगसह इतर आरोपींच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत तिची महत्त्वाची भूमिका होती. गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने ती पळून गेली होती, अखेर तिला चार वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page