जे जे हॉस्पिटलच्या 26 वर्षांच्या निवासी डॉक्टरची आत्महत्या

मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – जे. जे हॉस्पिटलच्या रेडिओ लॉजीच्या पहिल्या वर्षांत शिकणार्‍या एका 26 वर्षांच्या निवासी डॉक्टरने त्याच्याच हॉस्टेलमधील रुममध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभयसिंग नरसिंग मोरे असे या डॉक्टर तरुणाचे नाव असून तो काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात आला होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अभयसिंग याच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि हॉस्टेलमधील इतर सहकारी निवासी डॉक्टरची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून त्याच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही घटना मंगळवारी दुपारी जे. जे हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये घडली. याच हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रुम क्रमांक 604 मध्ये अभयसिंग मोरे हा त्याच्या सहकारी डॉक्टरासोबत राहत होता. तो मूळचा धाराशिवच्या वाशी, दसेमगावचा रहिवाशी असून सध्या रेडिओ लॉजीच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत होता. त्याला साईक अ‍ॅक्ट्रिकचा आजार होता, त्यासाठी त्याची ट्रिटमेंट सुरु होती. त्याला डॉक्टरांनी औषधे दिली होती. उपचार सुरु असताना तो काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. या तणावामुळे त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून मंगळवारी दुपारी रुममध्ये कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

हा प्रकार नंतर त्याच्या सहकार्‍यांना समजताच त्यांनी हॉस्टेलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ही माहिती दिली. ही माहिती नंतर या अधिकार्‍यांकडून जे. जे मार्ग पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी अभयसिंगला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र मानसिक नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली असून ते मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. त्याच्या कुटुंबियांसह इतरांची पोलिसांकडून चौकशी करणार आहे. या चौकशीतून या आत्महत्येचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अभयसिंगच्या आत्महत्येचे वृत्त समजताच तेथील निवासी डॉक्टरांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page