जनसेवक सहकारी पतपेढीत पावणेचार कोटीचा आर्थिक घोटाळा

शाखाधिकारी-कॅशिअरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – घाटकोपरच्या भटवाडी परिसरात असलेल्या जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादीत या पतसंस्थेत सुमारे पावणेचार कोटीचा आर्थिक घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतपेढीचे शाखाधिकारी मंगेश विलास फोडसे आणि कॅशिअर जितेंद्र रामदास शिंदे या दोघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 2021 ते 2024 या कालावधीत या दोघांनी इतर आरोपींच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

चंद्रकांत बुधाजी हुलवळे हे घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहत असून त्यांचा फुलविक्रीचा व्यवसाय आहे. याच परिसरात जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादीत नावाची एक पतसंस्था असून या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. मुंबई शहरात त्याचे पाच शाखा आणि एक मुख्यालय आहे. त्यातील एक शाखा आणि मुख्यालय घाटकोपर येथील भटवाडी, एस. जी बर्वे नगरात आहे. त्यात सुमारे दहा हजार सभासद आहेत तर पन्नासहून अधिक कर्मचारी कामाला आहेत. सभासदाकडून ठेवी स्विकारणे, गरजू सभासदांना कर्ज वाटप करणे आदी सेवा पतसंस्थेकडून केले जात होते. मुख्यालयात विनोद गोविंद शिंदे हे व्यवस्थापक तर निलेश लक्ष्मण शिंदे हे लिपीक म्हणून काम करतात. त्यांच्यावर पाचही शाखांचा हिशोब ठेवणे, शाखेवर नियमंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

घाटकोपर येथील शाखेत मंगेश फोडसे शाखाधिकारी तर जितेंद्र शिंदे हा कॅशिअर म्हणून काम करतात. मुख्यालयासह पाचही शाखेचे दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर महिन्यांत वार्षिक तपासणी आणि लेखापरिक्षण केले जाते. ऑगस्ट 2024 रोखपाल जितेंद्र शिंदे हा अचानक रजेवर गेले होते. त्यामुळे त्याच्या जागी मंगेश फोडसे याच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.वारंवार विचारणा करुनही जितेंद्र कामावर रुजू होत नव्हता. ऑगस्ट 2024 नंतर तो कामावर हजर राहिला नाही. याच दरम्यान मंगेश फोडसे याने शाखेतील कॅशमध्ये प्रचंड तफावत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चंद्रकांत हुलवळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

त्यासाठी संदेश नावाडकर यांची मुख्य लेखा परिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी शाखेच्या सर्व आर्थिक व्यवहाराची तपासणी केली होती. त्यात त्यांना 26 एप्रिल 2021 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत घाटकोपरच्या पतसंस्थेतून 3 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे दिसून आले. याबाबत एक अहवाल त्यांनी जुलै 2025 रोजी कमिटीला सादर केला होता. या अहवालात त्यांनी या संपूर्ण घोटाळ्यात शाखाधिकारी मंगेश फोडसे आणि कॅशिअर जितेंद्र शिंदे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप केला होता.

याकामी त्यांना इतर काही कर्मचार्‍यांनी मदत केली होती. त्यांच्याशिवाय त्यांना हा आर्थिक घोटाळा करता आला नसता असे स्पष्टपणे नमूद केले होते. हा प्रकार उघडकीस येताच पतसंस्थेच्या वतीने चंद्रकांत हुलवळे यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र शिंदे आणि मंगेश फोडसे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page