उसने घेतलेल्या पैशांवरुन तरुणाची स्क्रु ड्राव्हरने भोसकून हत्या

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर एकाला अटक तर दोघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – उसने घेतलेल्या पैशांवरुन झालेल्या वादातून समीर नासीर शेख या तरुणाची त्याच्याच तीन मित्रांनी बेदम मारहाणीसह स्क्रु ड्राव्हरने भोसकून हत्या केल्याची घटना शिवडी परिसरात घडली. याप्रकरणी तिन्ही आरोपी मित्रांविरुद्ध शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत किसन जयदीप पांडे ऊर्फ दुबे याला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रिझवान समीर शेख आणि जसीम सय्यद हे दोघेही सहआरोपी असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. हत्येनंतर ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री उशिरा अडीच वाजता शिवडीतील रामगड, मिनर्व्हा कंपाऊंड, मोहन कोळी यांच्या टपरीसमोर घडली. याच परिसरात खालिद रमजान हाश्मी हा राहत असून तो सुकी मासे विक्रीचे काम करतो. मयत समीर आणि आरोपी मित्र असून ते सर्वजण एकाच परिसरात राहतात. गुरुवारी रात्री उशिरा खालिद, समीर, किसन, रिझवान आणि जसीम असे सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते. यावेळी जसीमआणि समीर यांच्या उसने घेतलेल्या पैशांवरुन वाद झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांवर शिवीगाळ करुन मारहाण केली होती. यावेळी रिझवान आणि किसन यांनी वसीमला बेदम मारहाण केली होती.

या भांडणानंतर रागाच्या भरात जसीमने त्याच्या स्कूटीमधून स्कू्र ड्रायव्हर काढून वसीमच्या मानेवर भोसकले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या समीरला खालिदसह इतरांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना समीरचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी खालिद हाश्मीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी किसन पांडे, रिझवान शेख आणि जसीम सय्यद यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते तिघेही पळून गेले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना किसन पांडे याला पोलिसांनी अटक केली तर इतर दोघेही पळून गेले. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर किसनला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page