नांदेडचा होमिओपॅथीचा 25 वर्षांचा विद्यार्थी मुंबईत मागत होता भिक्षा
मालाड पोलिसांच्या सतर्कमुळे दिड महिन्यानंतर कुटुंबियांची भेट
अरुण सावरटकर
22 मे 2026
मुंबई, – गेल्या दिड महिन्यांपासून नांदेडहून मिसिंग झालेला, होमिओपॅथीच्या तिसर्या वर्षांत शिकणारा, मानसिक आजार असलेला अभय सुरेश बेळकोनी हा 25 वर्षांचा मुलगा मुंबई शहरात भिक्षा मागत होता, मात्र मालाड पोलिसांच्या सतर्क अभयची त्याच्या कुटुंबियांची भेट घडवून आणण्यात यश आले आहे. मिसिंग झालेला मुलगा सुखरुप सापडल्याने बेळकोनी कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व अन्य पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले आहे. या कामगिरीबाबत वरिष्ठांकडूनही मालाड पोलिसांचे कौतुक होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांनी रस्त्यावर भिक्षा मागणार्या भिक्षेकरुच्या पुर्नवर्सनासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यत चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या आदेशावरुन मालाड पोलिसांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. ही मोहीम सुरु असताना या पथकाला मालाडच्या एस. व्ही रोडवर एक तरुण भिक मागत असल्याचे दिसून आले होते. त्याला पोलीस हवालदार कोमलसिंग जाधव यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. त्याची चौकशी केल्यानंतर तो काहीच बोलत नव्हता. प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहून तो प्रचंड घाबरला होता. बोलण्याचा मनस्थित नसलेल्या या तरुणाकडून पोलिसांना काहीच माहिती उपलब्ध मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत त्याची शारीरिक स्वच्छता करण्यात आली. तो भुकेला होता, त्यामुळे त्याला जेवण देण्यात आले. जेवणानंतर त्याची पोलिसांनी आपुलकीने चौकशी सुरु केली होती. यावेळी त्याने त्याचे नाव अभय सुरेश बेळकोनी (25) असल्याचे सांगितले. तो नांदेडच्या हाथगाव, तामसा गावचा रहिवाशी होता. तो होमिओपॅथीच्या तिसर्या वर्षांत शिकत होता. त्याची बॅग ट्रेनमध्ये चोरीस गेली होती. या बॅगेत त्याचे कपडे, आई-वडिलांसह इतर नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक गहाळ झाले होते.
भूक लागल्याने तो भिक मागत होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक मनिष कागलकर यांनी तातडीने तामसा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडेकर यांना कॉलवरुन त्याची माहिती दिली. ही माहिती घेताना अभय बेळकोनी याची तिथे मिसिंग तक्रार असल्याचे उघडकीस आले. ही तक्रार त्यांचे वडिल सुरेश बेळकोनी यांनी दिली होती. त्यानंतर त्यांचा मोबाईल प्राप्त करुन त्यांना संपर्क साधण्यात आला होता. यावेळी त्यांनी अभय हा त्यांचा मुलगा असून तो मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
गेल्या दिड महिन्यांपूर्वी तो घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्याचा त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी तामसा पोलीस ठाण्यात त्याच्या मिसिंगची तक्रार केल्याचे सांगितले. या माहितीनंतर अभयचा फोटो त्यांना पाठविण्यात आला होता. त्यांनी तो त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना मालाड पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले. गुरुवारी बेळकोनी कुटुंबिय मुंबईत आले होते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी तसेच योग्य ती शहानिशा करुन अभयला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
दिड महिन्यांपूर्वी मिसिंग झालेला अभय हा सुखरुप सापडल्याने त्यांच्या वडिलांसह इतर कुटुंबियांनी मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले होते. सुरेश बेळकोनी हे स्वत शिक्षक असून त्यांचा मोठा मुलगा औरंगाबाद येथील एका शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. त्यांचा त्यांच्या लहान मुलगा अभयवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे तो मिसिंग झाल्यापासून ते त्याचा शोध घेत होते. अखेर तो मुंबईत भीक मागताना पोलिसांना सापडला. दरम्यान मालाड पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.