बारा लाखांच्या चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह आरोपीस अटक

उत्तरप्रदेशातील मित्राच्या शेतात चोरीचे दागिने पुरुन ठेवले होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जुलै २०२६
मुंबई, – कारमधील विसरुन गेलेले सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करुन उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या आरोपीस अखेर विक्रोळी पोलिसांनी अटक केली. विकास रामनिवाश यादव असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून तो चालक म्हणून काम करतो. चोरीचे दागिने त्याने मित्राच्या शेतात पुरुन ठेवले होते, ते सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर विकासला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. गुन्हा दाखल होताच अवघ्या ७२ तासांत या गुन्ह्यांचा पोलिसांनी पर्दाफाश करुन चोरीच्या मुद्देमालासह मुख्य आरोपीस गजाआड केले.

विवेक बैजनाथ लोदी हे विक्रोळीतील कन्नमवारनगर परिसरात राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना भार्ईदर येथे एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचा विचार केला होता. २९ जूनला याच कामासाठी ते पत्नीचे दागिने घेऊन अंधेरीतील एका खाजगी कंपनीत गेले होते. मात्र त्यांचे काम झाले नाही. त्यामुळे ते सायंकाळी पुन्हा घरी आले होते. यावेळी त्यांनी त्यांची कार विकास यादवला पार्किंग करण्यासाठी दिली होती, कार पार्किंग करुन तो चावी देऊन निघून गेला होता.

याच दरम्यान त्यांना पत्नीचे दागिने कारमध्ये राहिल्याचे लक्षात आले, त्यामुळे ते कारजवळ आले आणि त्यांनी दागिन्यांची पर्स शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कुठेच पर्स सापडली नाही. त्यामुळे त्यांनी घरी दागिन्यांचा शोध घेतला, त्यांना घरातही दागिने सापडले नाही. सुमारे बारा लाखांचे विविध सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी विक्रोळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २ जुलैला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता. तपासात या घटनेनंतर कार पार्किंग करणारा विकास यादव हा अचानक कुठेतरी निघून गेला होता. त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्याविषयी कोणालाही काहीही माहिती नव्हती. तो उत्तरप्रदेशातील झांसी परिसरात राहत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजली होती.

हाच धागा पकडून पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व अन्य पोलीस पथक उत्तरप्रदेशात गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावी पळून आलेल्या विकासला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच कारमधील सुमारे बारा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करुन गावी पलायन केल्याची कबुली दिली. ते दागिने त्याने त्याच्या मित्राच्या गावातील शेतात पुरुन ठेवले होते. घटनास्थळी जाऊन गेल्यानंतर पोलिसांनी शेतात पुरुन ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. विकास हा मूळचा उत्तरप्रदेशच्या झांसी, सिमराचा रहिवाशी असून चालक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या ७२ तासांत आरोपीला अटक करुन त्याच्याकडून चोरीचे सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. त्यामुळे या पोलीस पथकाचे वरिष्ठांनीही कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page