जिवे मारण्याच्या धमकीनंतर 20 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – विनाकारण बेदम मारहाण करुन अपमानित करुन जिवे मारण्याच्या धमकीनंतर सुखावतअली ऊर्फ गुलफाम सज्जादअली सिद्धीकी नावाच्या एका 20 वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जहाँगीर हैदर शेख असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीतील शिवाजीनगर, संजयनगरचा रहिवाशी आहे. गुन्हा दाखल होताच जहाँगीर हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मोहम्मदअली सज्जादअली सिद्धीकी ऊर्फ शाहबाज हा 25 वर्षांचा तरुण गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. मृत गुलफाम हा त्याचा लहान भाऊ असून तो लेबरचे काम करतो. 26 एप्रिलला संपूर्ण सिद्धीकी कुटुंबिय मुंब्रा येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी गुलफाम हा एकटाच घरी झोपला होता. त्याने त्याचे अंग दुखत असल्याचे सांगून लग्नाला येत नसल्याचे सांगितले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते सर्वजण रात्री उशिरा पावणेदोन वाजता घरी आले होते. मात्र दार ठोठावून गुलफामने दरवाजा उघडला नाही. त्याने आतून दरवाजा बंद केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याचा वाहिदअलीने खिडकीतून आत डोकावून पाहिले, यावेळी त्याला गुलफामने घरात लुंगीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. लुंगी कापून त्यांनी गुलफामला खाली उतरविले. त्याला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मदअलीने त्याचा भाऊ गुलफामच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करुन त्याच्या आत्महत्येला जहाँगीर शेख हाच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या आत्महत्येची चौकशी करण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.

चौकशीदरम्यान मोहम्मदअलीला गुलफाम, त्याचा मित्र जिशान हे दोघेही 18 एप्रिलला रात्री दोन वाजता परिसरात फिरत होते. यावेळी संजयनगर पार्ट दोनजवळील डंपिंग नाल्याजवळ त्यांना जहाँगीर शेख भेटला होता. त्याने त्यांना तिथे त्याचा एमडीचा व्यवसाय चालतो, त्यामुळे रात्रीच्या वेळेस तिथे जायचे नाही असे बोलून गुलफामला हाताने तसेच लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन अपमानित केले होते. इतकेच नव्हे तर तिथे पुन्हा आल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जहाँगीर हा याच परिसरात राहत असून तो एमडी ड्रग्जची तस्करी करतो. त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्याच्या धमकीनंतर गुलफाम हा प्रचंड मानसिक तणावात होता.

त्याला जहाँगीर हा त्याला जिवे मारणार अशी सतत भीती वाटत होती. त्याने त्याला मारण्यापूर्वीच तोच आत्महत्या करणार असल्याचे सांगत होता. 26 एप्रिलला त्याचे घरचे सर्वजण मुंब्रा येथे गेल्यानंतर गुलफाम हा एकटाच घरी होता. मानसिक नैराश्यातून त्याने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच मोहम्मदअलीने शिवाजीनगर पोलिसांत जहाँगीर शेख याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्याच्या भावाच्या आत्महत्येला तोच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page