अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा 22 दिवसांनी मृत्यू
मृत ज्ञानदिप पतसंस्थेचा अधिकारी; कारचालकावर गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – गेल्या महिन्यांत विक्रोळी येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या सुनिल शिवाजी पिसाळ या व्यक्तीचा जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर मृत्यू झाला. ज्ञानदिप पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी असलेले सुनिल पिसाळ यांच्यावर गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरु होते, अखेर 20 मेला त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले. याप्रकरणी पांडुरंग बाळकृष्ण सावंत या कारचालकाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस तर दुसर्याला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी तीन वाजता मुलुंड-भायखळा असा प्रवास करताना विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्ग, एरोली ब्रिज उतरणीवरील दक्षिण वाहिनीवर झाला होता. श्रीकांत विजय शिंदे हा तरुण गिरगाव येथे राहत असून तो सध्या डिजीटल मार्केटिंगच्या प्रथम वर्षाला शिकतो. त्याचे वडिल विजय शिंदे हे चालक असून असून आई दिपाली ही ज्ञानदिप पतसंस्थेत कलेक्शन प्रतिनिधी म्हणून काम करते. सुनिल पिसाळ हे ज्ञानदिप पतसंस्थेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असून तो त्यांना बर्याच वर्षांपासून ओळखतात.
29 एप्रिलला पतसंस्थेचे अधिवेशन मुलुंड येथे होते. त्याची आई आजारी असल्याने तो अधिवेशनाला जाणार होता. त्यामुळे तो सुनिल पिसाळ यांच्या अॅक्टिव्हा स्कूटीवरुन अधिवेशनाला गेला होता. सकाळी सुरु झालेले अधिवेशन दुपारी संपले. त्यानंतर ते दोघेही मुलुंडहून भायखळा येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी तीन वाजता त्यांची स्कूटी पूर्व दुतग्रती महामार्गावरुन एरोली ब्रिजवरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली होती.
या अपघातात सुनिल पिसाळ आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही जखमी झाले होते. यावेळी आरोपी कारचालक पांडुरंग सावंत यांच्यासह इतरांनी त्यांना विक्रोळीतील कन्नमवारनगरातील आदि आरोग्यम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. श्रीकांतला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. सुनिल पिसाळ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी 20 मेला उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले होते.
श्रीकांतसह त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना अपघाताची तक्रार करता आली नव्हती. गुरुवारी त्याने घडलेला प्रकार विक्रोळी पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक पांडुरंग सावंतविरुद्ध हलर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस तर दुसर्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.