मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – उत्तरप्रदेशातून मुंबई शहरात चरस विक्रीसाठी आलेल्या एका 30 वर्षांच्या तरुणाला वरळी युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. फारुख खान असे या आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 3 किलो 886 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. आंतररराष्ट्रीय बाजारात याच चरसची किंमत 3 कोटी 88 लाख 60 हजार रुपये इतकी किंमत आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार 25 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यात घातक शस्त्रांसह ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा शस्त्रासह ड्रग्ज विक्री करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण इतर राज्यातून आणलेला ड्रग्जची डिलीव्हरीसाठी चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती वरळी युनिटचे प्रमुख संतोष साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
गुरुवारी सायंकाळी तिथे फारुख आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यासह त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यात पोलिसांना 3886 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा सापडला. त्याची किंमत 3 कोटी 88 लाख रुपये इतकी आहे. तपासात त्याने तो चरस उत्तरप्रदेशातून आणल्याचे सांगितले. फारुख हा उत्तरप्रदेशच्या कानूपरचा रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी तो त्याच्या वडिलांसोबत मुंबई शहरात फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर आता तो चरसची डिलीव्हरीसाठी मुंबईत आला होता, मात्र चरसची डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला वरळी युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली.
त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. जप्त केलेला चरस तो कोणाला देणार होता, त्याला ते चरस कोणी दिले होते, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.