कौटुंबिक वादातून लाथ्याबुक्यांनी मारहाण केलेल्या पत्नीचा मृत्यू

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत आरोपी पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मे 2026
मुंबई, – क्षुल्लक कौटुंबिक वादातून पत्नीची पतीने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुक्साना शहानुद्दीन शेख असे या 42 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती शहानुद्दीन डालीमुद्दीन शेख याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत शुक्रवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जारा रज्जाक शेख ही तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील यारी-रोड, वर्सोवा, सागर कुटीर संघ परिसरात राहते. रुक्साना ही तिची मोठी बहिण असून ती तिच्या पती शहानुद्दीनसोबत त्यांच्याच शेजारी राहते. त्यांना दोन मुले असून तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रसतीच्या वेळेस तिचे सिझर झाले होते, त्यामुळे तिला लो बीपीचा त्रास होता. सोमवारी 18 मेला कौटुंबिक कारणावरुन रुक्साना आणि शहानुद्दीन यांच्यात वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने रुक्सानाने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे तिला पोटाला गंभीर दुखापत झाली होती.

हा प्रकार समजताच जारासह इतर मंडळींनी तिच्या घरी धाव घेऊन तिला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिचे सोनोग्राफी आणि एक्सरे काढण्यात आले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर तिला रात्री उशिरा घरी आणण्यात आले होते. घरी आणल्यानंतर तिच्या पोटात पुन्हा वेदना होऊ लागले. त्यामुळे तिला त्यांनी जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक दिवसांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.

औषधोपचार करुनही तिच्या पोटात वेदना होत होत्या. त्यामुळे तिला पुन्हा लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना तिची प्रकृती प्रचंड बिघडली होती. त्यामुळे त्यांनी तिला पुढील उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये हलविले होते. तिथे तिच्यावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रात्री साडेदहा वाजता तिच्यावर ऑपरेशन झाले, मात्र ऑपरेशननंतर ती शुद्धीवर आली नाही. तिचे हार्ट बीट कमी होऊ लागले, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात तिच्या पोटावर लाथ्याबुक्यांनी मारहाण झाल्याने तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

या घटनेनंतर जारा शेख हिने रुक्सानाच्या पती शहानुद्दीन शेख याच्याविरुद्ध तिला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शहानुद्दीनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. रुक्सानाच्या मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page