फोर्ट परिसरातून विदेशी घातक शस्त्रांसह तिघांना अटक

तीन विदेशी पिस्तूल मॅगझीनसह 45 जिवंत काडतुसे हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मे 2026
मुंबई, – फोर्ट परिसरातून विदेशी घातक शस्त्रांसह तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जशन प्रितमंगल सिंह, सुखविंदर चंद्रपाल आणि अरबाज अन्वर चौधरी अशी या तिघांची नावे आहेत. यातील अरबाज हा राजस्थान तर जशन आणि सुखविंदर हे दोघेही पंजाबचे रहिवाशी आहे. या तिघांकडून पोलिसांनी तीन विदेशी पिस्तूल, तीन मॅगझीन आणि 45 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. पंजाब येथून मुंबई शहरात ते तिघेही शस्त्रांची विक्रीसाठी आले होते, मात्र त्यापूर्वीच या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत ते दोघेही गेल्या चार वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून देशी-विदेशी घातक शस्त्रे मुंबई शहरात आणून त्याची विक्री करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. या घातक शस्त्रांचा विविध गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्र तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात काहीजण इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, रुपेश पाटील, पोलीस हवालदार विजय शेंदरकर, अमीत चौधरी, अतिश थोरात, विपीन निकम, महेश मुळे, प्रमोद शिर्के, कैलास चौगुले, अमोल तोडकर, संदीप पाटील, पोलीस शिपाई कैलास जाधव, किरण बनसोडे, किरण सोनकांबळे, संतोष वायाळ, उत्कृष्ट कदम, निरंक कुटे, प्रथमेश उत्तेकर आणि संतोष बेरड यांनी शुक्रवारी रात्री फोर्ट परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

रात्री पावणेअकरा वाजता सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील पी. डिमेलो रोड, ईस्टर्न फ्रिवेकडे जाणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरील उत्तर वाहिनीवर तीन तरुण आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटत होती. ते तिघेही कोणाची तरी वाट पाहत होते. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना तीन विदेशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि 45 जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत त्यांनी ते घातक शस्त्रे मुंबई शहरात विक्रीसाठी घेऊन आल्याचे सांगितले. या तिघांनाही नंतर खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात आणण्यात आले. चौकशीत त्यांची नावे जशन सिंह, सुखविंदर चंद्रपाल आणि अरबाज चौधरी असल्याचे उघडकीस आले.

अरबाज हा राजस्थानच्या झालावाड तर इतर दोघेही पंजाबच्या पटियालाचे रहिवाशी आहेत. चौकशीत 2022 साली जशन सिंह आणि सुखविंदर चंद्रपाल यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल आहे. या हत्येनंतर ते दोघेही पळून गेले होते. गेल्या चार वर्षांपासून ते पोलिसांना सतत गुंगारा देत होते. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही घातक शस्त्रांसह पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, घातक शस्त्रांची विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ते शस्त्रे त्यांना कोणी दिले, मुंबईत शस्त्रांची कोणाला विक्री करणार होते. त्यांच्याविरुद्ध हत्येसह इतर गुन्ह्यांची नोंद आहे का, जप्त केलेल्या घातक शस्त्रांचा इतर कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page