शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वयोवृद्ध सिनेकलाकराची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मे 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका वयोवृद्ध सिनेकलाकराची ऑनलाईन फसवणुक कटातील वॉण्टेड आरोपीस मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली. सतबीर निशांत सिंग असे या 32 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग तसेच त्याने फसवणुकीसाठी बॅकेत खाते उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने उघडलेल्या बँक खात्यात विविध राज्यातील 47 ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाल्याचे बोलले जाते.
67 वर्षांचे सुहास मोरेश्वर वैद्य हे सिनेकलाकार असून मालाडच्या मालवणी क्रमांंक एक, जनकल्याणनगर, प्रसन्न वास्तू अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना सानिया जोशी नावाच्या एका महिलेने संपर्क साधला होता. तिने त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती देताना त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान तिने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते. या ग्रुपमध्ये त्यांच्यासह इतर काही सभासद होते, या सभासदांनी मोठ्या प्रमााणात शेअरमध्ये गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे तीन लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनाही चांगला फायदा झाला होता, मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत वारंवार विनंती करुनही त्यांना गु्रप अॅडमिनसह सानिया जोशी हिने प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मार्च 2026 रोजी संबंधित आरोपींविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, अमर शिंदे, पोलीस हवालदार राबड, पोलीस शिपाई पोतेकर, महिला पोलीस शिपाई मीना राऊत यांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन संबंधित आरोपी मध्यप्रदेशात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने मध्यप्रदेशच्या इंदौर शहरातून सतबीर सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याचा गुन्ह्यांत सहभाग येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाकडून ट्रान्झिंट रिमांड मिळताच त्याला पुढील चौकशीासठी मुंबईत आणण्यात आले. सतबीर सिंगने एका खाजगी बँकेत खाते उघडले होते. याच बँक खात्यात तक्रारदाराच्या फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. त्याच्या बँक खात्यात विविध राज्यातील 47 तक्रारी प्राप्त झाले आहे.
फसवणुकीसाठी सायबर ठगांनी त्याच्या बँक खात्याचा वापर केला होता. त्यासाठी त्याला प्रत्येक गुन्ह्यांतील रक्कमेपैकी काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.