पत्नीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन पतीचे पलायन

हत्येनंतर पळून गेलेल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मे 2026
मुंबई, – क्षुल्लक कौटुंबिक वादातून पत्नीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन आरोपी पतीने पलायन केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहम्मद शमशुद्दीन या 30 वर्षांच्या आरोपी पतीविरुद्ध मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर त्याची पत्नी सेलिमा खातून (33) हिची हत्या करुन तिचा मृतदेह घरात ठेवून पलायन केल्याचा आरोप आहे. तो मूळचा ओरिसाचा रहिवाशी असून हत्येनंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक ओरिसा येथे गेल्याचे सांगण्यात आले.

ही घटना 18 मे रात्री बारा ते 22 मे 2026 रोजी रात्री बारा या कालावधीत मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक सात, एनसीसी, प्लॉट क्रमांक पाचमध्ये घडली. याच परिसरातील फ्लॅट क्रमांक 58 मध्ये मोहम्मद शमशुद्दीन हा त्याची पत्नी सेलिमासोबत राहत होती. सेलिमा ही मूळची कोलकाता तर शमशुद्दीन हा ओरिसाचा रहिवाशी आहे. तो तिच्यापासून तीन वर्षांनी लहान होता. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. 18 मेला सेलिमाला स्थानिक रहिवाशांनी शेवटचे पाहिले नाही. त्यानंतर तिचा घराचा दरवाजा बंदच होता.

22 मेला तिच्या घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी शमशुद्दीनला कॉल करुन ही माहिती दिली. यावेळी त्याने उंदीर मेल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र प्रचंड दुर्गधी असल्याने त्यांना संशय निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ही माहिती मालवणी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये पोलिसांना सेलिमाचा मृतदेह सापडला. तिची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

तिची लहान बहिण हलीमा खातून अरफअली मौला ही कोलकाता येथील परगाना, नॉर्थच्या कुमारजोल परिसरात राहते. ही माहिती नंतर तिला देण्यात आली होती. मुंबईत आल्यानतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागे तिचा पती शमशुद्दीनचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानेच सेलिमाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करुन घटनास्थळाहून पलायन केले आहे. स्थानिक रहिवाशांनी त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.

हत्येनंतर तो ओरिसा येथे पळून गेल्याचा संशय असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम तिथे रवाना झाली आहे. या गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आहे. हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र कौटुंबिक किंवा आर्थिक वादातून सेलिमाची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page