शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या बहाण्याने महिला शिपायाची फसवणुक
चांगल्या परताव्या आमिषाला बळी पडणे चांगलेच महागात पडले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मे 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीवर काही तासांत चांगला फायदा मिळवून देतो असे सांगून अज्ञात सायबर ठगाने एका महिला पोलीस शिपायाची 76 हजार 719 रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन भायखळा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडणे या महिला पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे.
तक्रारदार महिला कल्याणच्या शहाड परिसरात असून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी 21 मेला ती तिच्या मुलासोबत भायखळा येथील जिजामाता उद्यानात आली होती. यावेळी मोबाईलवर फेसबुकमधील व्हिडीओ पाहत असताना तिला ट्रेड विथ प्रतिक सहानी या गु्रपची माहिती दिसली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला एका ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. यावेळी तिला समोरील व्यक्तीने मॅसेज करुन किती रुपये गुंतवणुक करणार अशी विचारणा केली होती. तिने दहा हजार रुपये गुंतवणुक केल्यास किती फायदा होईल असा मॅसेज केला. यावेळी या व्यक्तीने तिला दहा हजारावर साठ हजार रुपये तर पाच हजारावर तीस हजार रुपये फायदा होईल असे सांगितले. त्यामुळे तिने त्याने पाठविलेल्या स्कॅनरवर पाच हजार रुपये पाठविले होते.
दोन तासांनी तिला गुंतवणुकीवर 45 हजार रुपये फायदा झाल्याचे समजले. त्यापैकी 25 टक्के कमिशन कंपनीची असेल. त्यामुळे त्याने तिला 11 हजार 392 रुपये पाठविण्यास सांगितले. तिने त्याला ती रक्कम पाठवून दिली. त्यानंतर त्याने तिला जीएसटी 28 टक्के पाठविण्यास सांगितले, त्यामुळे तिने जीएसटीची 18 हजार 359 रुपये पाठविले. काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने तिने चुकीचे पेमेंट केल्याचे सांगून तिला तिची रक्कम भारतीय रुपयांत बदलण्यासाठी आणखीन 23 हजार 599 रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला 23 हजार 599 रुपये पाठविले होते. सुरुवातीला तिला 45 हजार रुपये फायदा झाल्याचे सांगण्यात आले होते, नंतर तिला तीच रक्कम 1 लाख 12 हजार रुपये झाल्याचे सांगितले. तिने त्यांना तिचे उर्वरित रक्कम परत पाठविण्याची विनंती केली,
मात्र त्याने तिला पैसे पाठविले नाही. त्यासाठी तिने तिचा बँक खात्यासह आयएफसी कोड क्रमांक दिला होता. तरीही संबंधित व्यक्ती बँक खाते व्हेरीफाय होत नसल्याचे सांगून तिला आणखीन 29 टक्के चार्जेस म्हणून 29 हजार 544 रुपये पाठवावे लागतील असे सांगत होता. तिच्या फोन पे ट्रान्झेंशन लिमिट संपले होते, त्यामुळे तिने तिच्या बँक खात्यातून पैसे जात नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने तिला दुसर्या बँक खात्यातून पैसे पाठविण्याचा सल्ला दिला. यावेळी तिने तिच्या प्रॉफिटमधून ही रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम तिला पाठविण्याची विनंती केली. मात्र त्याने तिला अशा प्रकारे पेसे डेबीट होऊ शकत नाही. त्यासाठी तिलाच 29 हजार 544 रुपये पाठवावे लागतील असे सांगितले.
तिने पैसे पाठविण्यास नकार देताच त्याने तिला सात दिवसांत तिचे पैसे तिच्या बँक खात्यात जमा होतील असे सांगून तिला प्रतिसाद देणे बंद केले. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली नाही. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अज्ञात सायबर ठगाने तिची 76 हजार 719 रुपयांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने भायखळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.