बेस्टच्या कर्मचार्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
वीज मीटर बंद करुन काढून घेण्याची धमकी देऊन लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मे 2026
मुंबई, – बेस्टच्या एका कर्मचार्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नितीन कावळे असे या कर्मचार्याचे नाव असून त्याची लवकरच संबंधित अधिकार्याकडून चौकशी होणार आहे. तीन महिन्यांचे थकित वीज भरले नाही म्हणून वीज मीटर काढू नये म्हणून त्यांनी तक्रारदाराकडे तीन हजाराची लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती अडीच हजार रुपये घेण्याचे मान्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचा फुड कॅफे आहे. कॅफेच्या जागेचे त्यांनी तीन महिन्यांचे वीज बिल भरले नव्हते. तीन महिन्यांच्या थकित वीज बिलाची रक्कम 45 हजार 280 रुपये होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कॅफेला बेस्टचे कर्मचारी नितीन कावळे यांनी भेट दिली होती. त्यांनी त्यांचा वीज मीटर बंद करुन काढून घेऊन जाणार असल्याचे सांगितले होते. यावेळी तक्रारदारांनी त्यांना वीज मीटर न काढण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्या कॅफेचे वीज मीटर काढून नेण्याची धमकी दिली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्यावने त्यांनी त्यांच्याविरुद्ध 24 डिसेंबर 2025 रोजी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दोन दिवसांनी त्याची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती.
त्यात नितीन कावळे यांनी तक्रारदाराकडे वीज मीटर न काढण्यासाठी तीन हजाराची लाच मागून अडीच हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पाच महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांची त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.