शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू

काळाचौकी-माटुंगा पोलिसाकडून दोन स्वतंत्र अपघाताची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मे 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिवडी आणि माटुंगा परिसरात घडली. मृतांमध्ये प्रविणचंद्र शहा या वयोवृद्धाचा समावेश असून दुसर्‍या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी काळाचौकी आणि माटुंगा पोलिसांनी दोन्ही चालक मोहम्मद शफीक शेरमोहम्मद खान आणि अंकित शशिकांत म्हात्रे यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत आरोपी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पहिला अपघात शनिवारी मध्यरात्री साडेतीन वाजता माटुंगा येथील डॉ. बी. ए रोड, रुईया जंक्शनजवळील दक्षिण वाहिनीवर झाला. 47 वर्षांचे बंकीम प्रविणचंद्र शहा हे माटुंगा येथे राहत असून प्रविणचंद्र (74) हे त्यांचे वडिल आहेत. त्यांचे वडिल नेहमी मध्यरात्री साडेतीन वाजता मॉर्निंग वॉकला जातात आणि पहाटे पाच वाजता घरी येतात. शनिवारी सव्वातीन वाजता प्रविणचंद्र हे नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकसाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊन ते घरी आले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच बंकित शहा हे माटुंगा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी पोलिसांना त्यांना एक फोटो दाखविला होता.

तो फोटो त्यांच्या वडिलांचा होता. त्यांचे वडिल साडेतीन वाजता वॉक करत असताना त्यांना रुईया जंक्शनजवळ एका ट्रकने धडक दिली होती. ट्रकच्या चाकाखाली आल्याने ते जखमी झाले होते. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बंकित शहा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ट्रकचालक मोहम्मद शफीक शेरमोहम्मद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तो मूळचा गुजरातचा रहिवाशी असून सध्या सायन-कोळीवाडा परिसरात राहतो.

दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिवडी येथील कॉटनग्रीन पार्किंग, शिवडी पंपिंग स्टेशनजवळ झाला. पूजा शरद बोर्डे या काळाचौकी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी त्या रात्रपाळी प्रथम चौकशी पथकात कार्यरत होत्या. सायंकाळी साडेसात वाजता शिवडी पंपिंग स्टेशनजवळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे काळाचौकी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी गेले होते. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीला अग्निशमन दलाच्या वाहनाने धडक दिली होती. गाडीचा मागचा टायर डोक्यावरुन गेल्यानंतर संंबंधित व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता.

त्यामुळे त्याला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पूजा बोर्डे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अग्निशमन दलाचा वाहनचालक अंकित शशिकांत म्हात्रे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने गाडी चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page