अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या दिराची प्रियकराकडून हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या 29 वर्षांच्या दिराची प्रियकराने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण तसेच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना दहिसर परिसरात घडली. सागर गौतम सुगीरे असे या हत्या झालेल्या दिराचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी राम ख्रोबाजी दुधाने (34) या आरोपी प्रियकराला दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोठ्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवू नये म्हणून सागरने रामची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा राग आल्याने त्याने त्याची हत्या केल्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल एम देसाई यांनी सांगितले.

ही घटना सोमवारी दहिसर येथील डोंगरी केतकीपाडा, नचडी भैय्याजी चाळीत घडली. महेश गौतम सुगीरे हा बिगारी असून मूळचा उस्मानाबादचा रहिवाशी आहे. तो सध्या मिरारोड येथे त्याच्या पत्नीसोबत राहतो. मृत सागर हा त्याचा लहान भाऊ असून तो दहिसर येथे राहतो. पूर्वी गौतम हादेखील तिथेच राहत होता. त्याच्याच शेजारी राम दुधाने राहत होता. शेजारीच राहत असल्याने त्यांचा एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसांपूर्वी महेशला त्याच्या पत्नीचे रामसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यातून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. रागाच्या भरात त्याने त्याच्या पत्नीला उस्मानाबाद येथील गावी पाठविले होते.

काही दिवस राहिल्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली होती. सकाळी महेश कामावर गेल्यानंतर राम हा तिला भेटण्यासाठी येत होता. हा प्रकार समजताच सागर हा रामची समजूत घालणसाठी त्याच्याकडे गेला होता. यावेळी याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागातून त्याने सागरला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्याला पायर्‍यावरुन खाली फेंकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, इतकेच नव्हे तर त्याला दगडाने बेदम माहराण केली होती. त्यात सागर हा गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक अब्दुल देसाई यांच्यासह इतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी झालेल्या सागरला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर नायर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महेश सुगीरे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राम दुधाने याच्याविरुद्ध गंभीर दुखापतीसह हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रामचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना त्याला काही तासांत दहिसर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सागरची लाथ्याबुक्यांनी तसेच दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक अब्दुल एम. देसाई हे करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page