कांदिवलीतील कारखान्यातील 1.28 कोटीच्या दागिने चोरीचा पर्दाफाश

जम्मूहून दोन सुरक्षारक्षकांना चोरीच्या सोन्याच्या बांगड्यासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – कांदिवलीतील एका खाजगी कंपनीच्या लॉजिस्टिक बॉक्समध्ये ठेवलेल्या 1.28 कोटीच्या सोन्याच्या बांगड्याच्या चोरीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश करुन पळून गेलेल्या तीनपैकी दोन सुरक्षारक्षकांना जम्मूहून अटक केली. मोहम्मद शफीर मोहम्मद रशीद चौधरी आणि बिट्टू ऊर्फ वकार अहमद नाझीर हुसैन अशी या दोघांची नावे असून ते दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी सुमारे 65 लाख रुपयांचे 433 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बांगड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिसरा सुरक्षारक्षक अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला तक्रारदारांनी तिन्ही सुरक्षारक्षकांनी 5.28 कोटीचे 3176 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीची तक्रार केली होती, मात्र नंतर त्यांनी 1 कोटी 28 लाखांचे 864 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बांगड्या चोरी झाल्याचे सांगितले होते.

ही गुरुवारी घटना 14 मे 2026 रोजी रात्री सव्वाआठ ते साडेनऊच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, हिंदुस्तान नाका, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अशोक अमृतलाल वाया हे कांदिवलीतील चारकोप, मार्वे रोड, भूमी सिलेस्टिया अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगचा कच्चा सोन्यापासून सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये श्रीजी मॅन्युफॅक्चररस नावाची एक कंपनी आहे. कंपनीत 32 कर्मचारी व तीन सुरक्षारक्षक कामाला आहेत. या सुरक्षारक्षकामध्ये जम्मू-काश्मीरचा मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज गुज्जर यांचा समावेश होता. कंपनीत बनविलेल्या 5 कोटी 28 लाख 44 हजार 486 रुपयांचे 22 कॅरेटचे 3176 वजनाच्या सोन्याच्या बांगड्या एका लॉजिस्टिक बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.

14 मेला रात्री कंपनीच्या तळमजल्यावर काम करणार्‍या मोहम्मद सफीरने त्यांना एक व्हॉटअप मॅसेज पाठवून तुम्ही पगार देत नाही म्हणून तो नोकरी सोडून जात असल्याचे सांगितले. या मॅसेजनंतर त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा मॅनेजर महेंद्र सतिक्युवरला कॉल करुन मोहम्मद सफीरकडे जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर महेंद्रने त्यांना कॉल करुन कंपनीतील तिन्ही सुरक्षारक्षक जागेवर नाहीत. ते तिघेही नोकरी सोडून गेल्याचे दिसून येत असून त्यांचे कॉल लागत नाही अशी माहिती दिली. त्यानंतर महेंद्रने कंपनीतील सर्व सामानाची पाहणी केली. यावेळी त्याला 1 कोटी 28 लाख रुपयांचे 864 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बांगड्या असलेले बॉक्स दिसून आले नाही. कंपनीतील तिन्ही सुरक्षारक्षक मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज यांनी सोन्याचे बांगड्या असलेले बॉक्स चोरी करुन तेथून पलायन केले होते. ही माहिती अशोक वाया यांना समजताच ते कंपनीत आले होते. त्यानंतर त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद सफीर, विकास आणि शाहबाज गुज्जर यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या चोरीच्या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान तिन्ही आरोपी जम्मू-काश्मीरचे रहिवाशी असल्याने चोरीनंतर ते तिघेही त्यांच्या पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार वर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात, राजेंद्र कुंभार, पोलीस उपिनरीक्षक विशाल तेजाळे, आबासाहेब पवार, पोलीस हवालदार स्वप्निल शिंदे, पोलीस शिपाई सुदेश गायकवाड, विलास मस्के, तुषार शिंदे, आदित्य राणे आदीचे एक पथक जम्मूला पाठविण्यात आले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूंछ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळील संवेदनशील परिसरात आरोपींचा शोध घेतला, यावेळी तिथे लपून बसलेल्या मोहम्मद शफीर चौधरी आणि वकार अहमद हुसैन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघेही जम्मू-काश्मीरच्या पूंछ, मंडीचे रहिवाशी आहे. आई आणि पत्नीच्या मदतीने त्यांनी चोरीच्या सोन्याच्या बांगड्या उंच डोंगरावर पुरुन ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर तिथे जाऊन पोलिसांनी सुमारे 65 लाख रुपयांचे 433 ग्रॅम वजनाचे 49 सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत. या दोघांची नंतर ट्रॉन्झिंट रिमांड घेण्यात आली होती. या रिमांडनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

मुंबईत येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत एक आरोपी वॉण्टेड असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याला लवकरच उर्वरित सोन्याच्या बांगड्यासह अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page