55 वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीस अटक
रिक्षाचालक समजून दुसर्याच व्यक्तीची हत्या केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी पवई परिसरात मोहम्मद युसूफ या 55 वर्षांच्या झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच काही तासांत हत्येतील मुख्य आरोपी दिपक ऊर्फ दिपू नथूप्रसाद वर्मा याला पोलिसांनी अटक केली. दिपू हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या पवई परिसरात राहतो. रिक्षाचालकांसोबत झालेल्या वादातून त्याने मोहम्मद युसूफची रिक्षाचालक समजून हत्या करुन पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
25 मेला रात्री उशिरा पवईतील साकीविहार रोड, तुंगा गाव, लोढा सुप्रिमस आऊट गेटजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ पडलेल्या संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या व्यक्तीच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्याची हत्या झाल्याचे उघडकीस येताच पोलीस शिपाई विजय अरुण घाडगे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. परिसरातील शंभरहून अधिक सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संशयित आरोपी गुजरातला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पूनम यादव, आश्विनी रायबोले, योगेश जाधव, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे, सहाय्यक फौजदार जगदीश धारगळकर, पोलीस हवालदार संग्राम अतिग्रे, राहुल सकट, दिलीप माने, धनवडे, अमीत जगताप, रामकिशन मोरे, धनंजय जाधव, पोलीस अंमलदार चंद्रशेखर डफळे, अनिकेत निकम, निलेश मांडवे, सुधाकर निर्मळे, चेतन शिंदे आदीचे एक पथक गुजरातला पाठविण्यात आले होते. या पथकाने गुजरातच्या सुरत, पुष्पकनगर, राजस्थानी स्कूलजवळ दिपक वर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच संबंधित व्यक्तीच्या छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची कबुली दिली.
दिपक हा बांद्रा येथील बबेरु,लौली टिका माऊचा रहिवाशी असून सध्या तो पवईतील तुंगा गाव, शिवम स्कूलजवळील परिसरात राहतो. गेल्या आठवड्यात तो त्याच्या मित्रांसोबत मद्यप्राशन करण्यासाठी बसला होता. यावेळी त्याचे परिसरात रिक्षा पार्क करणार्या रिक्षाचालकासोबत वाद झाला होता. या वादातून त्यांनी संबंधित रिक्षाचालकावर हल्ला करण्याची योजना बनविली होती. घटनेच्या वेळेस मृत व्यक्ती तिथे झोपला होता. तो रिक्षाचालक समजून दिपकने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केला, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हत्येनंतर अटकेच्या भीतीने तो मुंबईतून गुजराला पळून गेला होता. मात्र सीसीटिव्ही फुटेजमुळे त्याची ओळख पटली आणि तो पकडला गेला.
दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असता त्याचे नाव मोहम्मद युसूफ असल्याचे उघडकीस आले होते. युसूफ हा रात्रीच्या वेळेस मिळेल त्या ठिकाणी झोपत होता. घटनेच्या वेळेस तो तुुंगा गावातील रिक्षा पार्क केलेल्या ठिकाणी झोपला होता. रिक्षा पार्क करुन तो तिथेच झोपल्याचे समजून दिपकने त्याच्याशी वाद घालून त्याची हत्या केली. संशशित रिक्षाचालकाच्या जागी त्याने दुसर्याच व्यक्तीची हत्या केली होती,
हा प्रकार नशा उतरल्यानंतर लक्षात येताच तो मुंबईतून पळून गेला, मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच काही तासांत दिपकला गुजरात येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक करुन या हत्येच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.