एमबीबीएससाठी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने गंडा

वॉण्टेड असलेल्या ऑल इंडिया ऑपरेशन संचालकाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – एमबीबीएससाठी मेडीकल कॉलेजमध्ये हमखास प्रवेश देतो असे सांगून रत्नागिरीच्या एका व्यक्तीची सुमारे चौदा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीचा ऑल इंडिया ऑपरेशन संचालक आदित्यकुमार ऊर्फ आगरपाडा अरविंद राव या आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासोबत या गुन्ह्यांत विद्या पाटील ऊर्फ वैशाली पाटील, प्रदीप नायक ऊर्फ गोवर्धन, व्यकंटराव कुसुमे आणि रोनित पावडे असे चौघेजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने बीडीडीएस, एमबीबीएस आणि बीएएमएस मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला असून त्यांच्याविरुद्ध अंधेरी, पवई आणि डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इर्शाद इसाक जांभारकर हे मूळचे रत्नागिरीचे रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत राहतात. गेल्या वर्षी त्यांची 20 वर्षांची मुलगी हदियाने विज्ञान शाखेतून परिक्षा दिली होती. त्याला तिला चांगले मार्क मिळाले होते, बारावीनंतर तिला एमबीबीएससाठी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. त्यासाठी तिने सीईटी सेलकडे रजिस्ट्रेशन केले होते. सीईटी परिक्षा दिल्यांनतर ती तेलंगणाच्या मेरिट लिस्टमध्ये आली होती. त्यानंतर तिने रत्नागिरी येथील मेडीकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळतो का याबाबत चौकशी सुरु केली होती. तसेच ती सोशल मिडीयावर माहिती घेत होती. यावेळी तिला सोशल मिडीयारव इडुव्हीओ लर्निंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जाहिरात दिसली होती.

ही कंपनी बीडीडीएस, एमबीबीएस आणि बीएएमएस मेडीकल कॉलेजमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने एमबीबीएस प्रवेशासाठी कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला होता. तिला विद्या पाटील हिने तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची कंपनी विद्यार्थ्यांना विविध कोर्सेससाठी तसेच प्रवेश मिळूवन देण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यासाठी कंपनीची कन्सल्टींग चार्जेस पाच लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने त्यांच्या कंपनीचे ऑल इंडिया ऑपरेशन संचालक आदित्यकुमार यांचा मोबाईल क्रमांक दिला होता.

या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यानंतर आदित्यकुमारने तिला एमबीबीएससाठी प्रवेश देण्याचे तसेच प्रवेश न मिळाल्यास 45 दिवसांत घेतलेले सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती तिच्या वडिलांसोबत अंधेरीतील सहार रोड, कॅलिडोनिया इमारतीच्या कार्यालयात आली होती. या कामासाठी त्यांनी त्यांना काही रक्कम दिली होती. मात्र पहिल्या आणि दुसर्‍या लिस्टमध्ये तिचे नाव आले नाही. यावेळी आदित्यकुमारने तिसर्‍या लिस्टमध्ये तिचे नक्की नाव येईल असे सांगितले.

काही दिवसांनी त्यांनी तिला तिचे जालन्याच्या बदनापूर, आयआयएमएसआर मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश झाल्याचे सांगितले.यावेळी तिला एक वर्षांची फी घेऊन येण्यास कार्यालयात बोलाविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे इर्शाद हे सुमारे नऊ लाखांची कॅश घेऊन तिथे गेले होते. ही रक्कम त्यांनी कार्यालयात जमा केली. त्यासाठी त्यांनी घरातील सर्व दागिने गहाण ठेवले होते.

ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी त्यांना कॉलेजचे अलोटमेंट लेटर आणि कंपनीला दिलेल्या पैशांचे अ‍ॅग्रीमेंट लेटर दिले होते. मात्र त्यांनी त्यांच्या मुलीचे मेडीकलमध्ये प्रवेश केला नाही. वेगवेगळे कारण सांगून ते त्यांची दिशाभूल करत होते. चौकशीदरम्यान या टोळीने भास्कर धनाजी म्हस्के, तुकाराम बाळासाहेब बोबडे, दयानंद बाबूराव खिल्लारे, लक्ष्मीनारायण सत्यनारायण वंगा आणि महेश प्रल्हाद पाटील, प्रफुल्ल गणपत सावंत यांनाही त्यांच्या मुलांना मेडीकलमध्ये प्रवेश देतो असे सांगून त्यांचयाकडून पैसे घेतले होते. मात्र कोणालाही मेडीकलमध्ये प्रवेश न देता त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येता इर्शाद जांभारकर यांनी इडुव्हीओ लर्निंग सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व्यकंटराव कुसुमे, ऑपरेशन मॅनेजर आदित्यकुमार, सहाय्यक सल्लागार क्रिष्णा पाटील, रोनित पावडे ऊर्फ नासीर शेख, प्रदीप नायर, विद्या पाटील यांच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेले होते तर काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी लोकल कोर्टात अर्ज केला होता.

या आरोपींचा शोध सुरु असतानाच यातील ऑल इंडिया ऑपरेशन संचालक आणि ऑपरेशन मॅनेजर आदित्यकुमार राव याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत फसवणुक करणारी ही सराईत टोळीने असून या टोळीविरुद्ध डी. बी मार्ग आणि पवई पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी आदित्यकुमारला पवई पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page