आईसोबत चॅटींग करतो म्हणून मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

सतरा वर्षांच्या आरोपी मुलाची डोंगरी सुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – आईसोबत चॅटींग करतो म्हणून रोहित संजय झनके या 24 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भांडुप गावात घडली. या हल्ल्यात रोहितच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ही घटना रविवारी सायंकाळी सव्वाचार वाजता भांडुप गाव येथील एम. डी केणी मार्ग, भीमज्योत मंडळासमोरील तथागत बुद्ध विहारजवळ घडली. रोहित संजय झनके हा भांडुप गाव्या एमडी केणी मार्ग, मिश्रानगरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सतरा वर्षांचा आरोपी मुलगा त्याचा मित्र असून गेल्या पाच वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. रोहित हा आरोपीच्या आई-वडिलांना ओळखत असून त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक त्याच्याकडे होता. अनेकदा तो त्याच्या आईशी मोबाईलवर बोलत होता, तिच्याशी चॅटींग करत होता.

हा प्रकार अलीकडेच आरोपी मुलाला समजला होता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. दोन महिन्यापूर्वी तो आरोपीसह त्याच्या आईसोबत एकत्र होते. यावेळी त्याने त्यांच्यातील चॅट पुन्हा पाहिले. त्याचा राग अनावर झाला आणि त्याने त्याच्या आईला मारहाण केली होती. तसेच रोहितला त्याच्या आईसोबत चॅटींग केल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. रविवारी सायंकाळी चार वाजता रोहित हा कामानिमित्त नाहूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता. भीमज्योत मंडळाजवळ येताच तिथे आरोपी आला आणि त्याने त्याच्या हातातील कोयत्याने रोहितच्या डोक्यावर आणि मानेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी रोहितला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने त्यांना दूर करुन त्यांच्या भांडणात मध्यस्थी केली तर त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. त्यामुळे रोहितला स्थानिक रहिवाशांनी जवळच्या अनिकेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहितची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या आरोपीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page